30.5 C
New York
Thursday, June 18, 2026

Buy now

spot_img

शांतता समितीची बैठक;बकरी ईद शांततेत व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून साजरी करा: जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे आवाहन*

*शांतता समितीची बैठक;बकरी ईद शांततेत व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून साजरी करा: जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे आवाहन*

बुलढाणा

बकरी ईद (ईद-अल-अजहा) हा सण त्याग, बलिदान, सौहार्द आणि शांततेचा संदेश देणारा सण आहे. हा सण सर्वांनी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून अत्यंत आनंदाने, उत्साहाने आणि शांततेत साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिजाऊ सभागृहात जिल्हास्तरीय शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक अशा ७० हून अधिक ठिकाणावरून अधिकारी व शांतता समितीचे सदस्य दृक्श्राव्य (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) माध्यमातून जोडले गेले होते.

जिल्हाधिकारी डॉ. देवरे पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये यापूर्वीच शांतता समितीच्या बैठका पार पडल्या असून, सर्व सदस्यांनी सण शांततेत साजरा करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रशासनाची तयारी पूर्ण असून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. तसेच तात्पुरत्या कत्तलखान्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वांनी आपल्या परिवारासह हा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करावा.

जिल्हा पोलीस अधीक्षक तांबे यांनी सांगितले की, ईदच्या निमित्ताने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, नगरपालिका आणि पशुसंवर्धन विभाग पूर्णपणे सज्ज आहे. प्रतिबंधित जनावरांची अवैध तस्करी रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सीमांवर आणि संवेदनशील ठिकाणी २४ तास कार्यरत राहणारे विशेष चेक नाके (तपासणी नाके) उभारण्यात आले आहेत. संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी या नाक्यांवर अहोरात्र लक्ष ठेवून असतील. कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर हालचाल किंवा सामाजिक शांतता भंग होण्याबाबत काहीही संशयास्पद माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही पोलीस अधीक्षक तांबे यांनी केले.

बैठकीदरम्यान उपस्थित असलेल्या शांतता समितीच्या विविध समाजातील प्रतिष्ठित सदस्यांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सदस्यांनी एकमुखाने सांगितले की, बुलढाणा जिल्हा हा नेहमीच सामाजिक सलोखा आणि शांतताप्रिय नागरिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, हीच गौरवशाली परंपरा यापुढेही कायम ठेवली जाईल. बकरी ईदचा सण साजरा करताना शासनाने जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे व नियमांचे तंतोतंत पालन केले जाईल. जिल्ह्यात कुठेही, कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडणार नाही आणि सलोख्याचे वातावरण अबाधित राहील, अशी ग्वाही यावेळी समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना दिली.

याच बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित सदस्यांना आणि नागरिकांना राष्ट्रीय महत्त्वाच्या योजनांमध्ये सहकार्य करण्याचे आवाहन केले. सणाच्या निमित्ताने मतदार यादी (SIR) विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ‘बीएलओ’ (BLO) आपल्या घरी येईल, त्यांना अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, आगामी जनगणनेसाठी येणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना योग्य माहिती देऊन सहकार्य करावे, तसेच राज्यातील सर्व नागरिकांना मोफत उपचारासाठी आयुष्मान कार्ड उपलब्ध करून दिले जात असून या योजनेची माहिती आणि प्रबोधन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हडे, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड हे प्रत्यक्ष उपस्थित होते. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी (SDM), तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि शांतता समितीचे प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बैठकीच्या शेवटी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सर्व मुस्लिम बांधवांना आणि जिल्हावासीयांना ईद-अल-अजहाच्या (बकरी ईद) मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Related Articles

ताज्या बातम्या