बुलढाणा फ्लॅश
*“बेघर कुटुंबासाठी आमदार संजय गायकवाड धावले मदतीला…*
*२५ हजारांची तात्काळ मदत, हक्काच्या घराचे आश्वासन”*
*“संकटात देवदूत ठरले आमदार संजय गायकवाड..*
*बिरसिंगपूर येथील गवई कुटुंबाच्या डोळ्यांत आले अश्रू”*
“लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ राजकारण नव्हे, तर संकटात सामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे,” याची प्रचिती पुन्हा एकदा बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या संवेदनशील कार्यातून दिली आहे. बिरसिंगपूर येथील बेघर झालेल्या गवई कुटुंबासाठी त्यांनी मदतीचा हात पुढे करत मानवतेचा जिवंत आदर्श निर्माण केला आहे. बुलढाणा तालुक्यातील ग्राम मौजे बिरसिंगपूर येथे शासनाच्या जागेवरील अतिक्रमित घरामध्ये समाधान आश्रु गवई व रमेश आश्रु गवई यांचे कुटुंब अनेक वर्षांपासून वास्तव्यास होते. मात्र, त्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या मॉडेल डिग्री कॉलेजच्या भूमिपूजनानंतर त्यांचे घर हटविण्यात आले आणि एका क्षणात संपूर्ण कुटुंब बेघर झाले. डोक्यावरचे छप्पर हिरावल्याने कुटुंबासमोर मोठा प्रश्न उभा ठाकला होता. लहान मुले, संसाराचे साहित्य आणि पुढील आयुष्याची चिंता यामुळे कुटुंब पूर्णपणे हतबल झाले होते. या घटनेची माहिती मिळताच आमदार संजय गायकवाड यांनी कोणतीही दिरंगाई न करता संबंधित कुटुंबाची भेट घेतली. कुटुंबाची बिकट परिस्थिती पाहून तेही भावूक झाले. “सामान्य माणसाच्या डोळ्यात अश्रू असताना लोकप्रतिनिधी शांत बसू शकत नाही,” अशी भावना व्यक्त करत त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात भाड्याच्या घरात राहण्यासाठी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत तात्काळ जाहीर करून दिली. यावेळी त्यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून गवई कुटुंबाला लवकरात लवकर कायमस्वरूपी हक्काचे घर मिळवून देण्याचे आश्वासन दिले. आमदार गायकवाड यांच्या या मदतीमुळे गवई कुटुंबाला मोठा मानसिक आधार मिळाला असून, “संकटाच्या वेळी आमदार साहेब देवदूतासारखे धावून आले,” अशा भावनिक शब्दांत कुटुंबीयांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या प्रसंगी ग्रामविकास अधिकारी कु. उज्वला भास्कर जाधव, विष्णूमामा मुळे, नगरपालिका पाणीपुरवठा सभापती गोटू शर्मा, नगरसेवक बबलू मावतवाल तसेच गावातील अनेक नागरिक उपस्थित होते. सामान्य जनतेच्या अडचणी समजून घेऊन तातडीने मदतीचा हात देणारे आमदार संजय गायकवाड यांच्या या कार्याचे बिरसिंगपूरसह संपूर्ण परिसरात कौतुक होत असून, “जनतेचा खरा लोकनेता” अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.



