20.3 C
New York
Thursday, June 18, 2026

Buy now

spot_img

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात बुलढाण्यात आंबेडकरी समाज आक्रमक; 2 जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बुलढाणा
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात बुलढाण्यात आंबेडकरी समाज आक्रमक; 2 जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

58 जातींच्या प्रतिनिधींसह सकल आंबेडकरी समाज एकवटणार; उपवर्गीकरण रद्द करण्याची मागणी

बुलढाणा येथे अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात सकल आंबेडकरी समाज तसेच 58 जातींच्या प्रतिनिधींच्या वतीने मंगळवार, 2 जून 2026 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता मलकापूर रोडवरील महापुरुषांच्या तीन पुतळ्यांजवळ एकत्र येऊन महापुरुषांना अभिवादन केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
संविधानाच्या कलम 341 अंतर्गत अनुसूचित जातींना मिळालेला दर्जा हा सामाजिक न्याय, प्रतिनिधित्व आणि समान संधीसाठीचा मूलभूत अधिकार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या दिशेने पावले उचलत असल्याचा आरोप करत, यामुळे समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याची भूमिका आंबेडकरी समाजाने घेतली आहे.
महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या 59 जातींपैकी 58 जातींच्या प्रतिनिधींना विश्वासात न घेता उपवर्गीकरणाचे षडयंत्र सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे हे उपवर्गीकरण तात्काळ रद्द करण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे.
यावेळी कोणत्याही पक्ष, गट किंवा संघटनेच्या नेतृत्वाखाली नव्हे, तर केवळ आंबेडकरवादी म्हणून एकत्र येऊन निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या