21.7 C
New York
Friday, June 19, 2026

Buy now

spot_img

स्मार्ट मीटरच्या नावाखाली सोलर ग्राहकांची आर्थिक लूट? बुलढाणा जिल्ह्यात संतापाची लाट…*

बुलढाणा ब्रेकिंग

*स्मार्ट मीटरच्या नावाखाली सोलर ग्राहकांची आर्थिक लूट? बुलढाणा जिल्ह्यात संतापाची लाट…*

*”स्मार्ट मीटर सक्ती नाही” म्हणणाऱ्या सरकारच्या भूमिकेलाच हरताळ; सोलर ग्राहकांचा आंदोलनाचा इशारा..*

बुलढाणा जिल्ह्यातील सोलर वीज ग्राहक सध्या स्मार्ट मीटरच्या सक्तीमुळे प्रचंड त्रस्त झाले असून या निर्णयाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. लाखो रुपये खर्च करून घरांवर सोलर पॅनल बसवून वीज बचतीचा प्रयत्न करणाऱ्या ग्राहकांना आता स्मार्ट मीटरमुळे अवाजवी वीज बिले भरावी लागत असल्याचा आरोप होत आहे. सोलर ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, खाजगी कंपनीमार्फत स्मार्ट वीज मीटर बसविण्याचे काम सुरू असून अनेक ठिकाणी ग्राहकांच्या संमतीशिवाय मीटर बदलले जात आहेत. स्मार्ट मीटर बसविल्यानंतर दरमहा ४ ते ५ हजार रुपयांपर्यंत वीज बिले येत असल्याचा दावा ग्राहकांनी केला आहे. त्यामुळे सोलर प्रकल्प उभारण्याचा नेमका फायदा काय, असा सवाल आता ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे… एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती नसल्याचे स्पष्ट केले असल्याचे सांगितले जात असताना, दुसरीकडे सोलर ग्राहकांना मात्र स्मार्ट मीटर लावण्याचे आदेश दिले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे शासनाच्या भूमिकेतच विसंगती असल्याचे बोलले जात असून ग्राहकांमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढत आहे. सोलर ऊर्जेचा वापर वाढावा, वीज बचत व्हावी आणि पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीला चालना मिळावी यासाठी शासनानेच प्रोत्साहन दिले. मात्र आता त्याच सोलर ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकला जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे ही योजना ग्राहकांच्या फायद्याची की तोट्याची, असा प्रश्न उपस्थित होत आहे… दरम्यान, सोलर ग्राहकांनी मुख्यमंत्री आणि ऊर्जा विभागाने तातडीने हस्तक्षेप करून सोलर ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती रद्द करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा जिल्हाभरातील सोलर ग्राहक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला असून याबाबत वीज वितरण कंपनीच्या कार्यालयालाही निवेदन देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून आता सोलर ग्राहक आणि वीज वितरण यंत्रणा आमनेसामने येण्याची चिन्हे दिसत असून येत्या काही दिवसांत हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे…

Related Articles

ताज्या बातम्या