बुलढाणा
‘आमदार आपल्या गावी’ उपक्रमात पळसखेड नागोच्या समस्या ऐकल्या; पाणीपुरवठा व विकासकामांबाबत तातडीचे निर्देश…
वन्यजीवांच्या धोक्यावर २२ किमी सौर कुंपणाचा प्रस्ताव; स्मशानभूमीच्या प्रश्नावरही आ. संजय गायकवाड यांची भूमिका
बुलढाणा तालुक्यातील पळसखेड नागो येथे ‘आमदार आपल्या गावी’ उपक्रमांतर्गत आयोजित आढावा बैठकीत आमदार संजय गायकवाड यांनी ग्रामस्थांच्या विविध समस्या जाणून घेत संबंधित विभागांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले. पाणीपुरवठा, वन्यजीवांचा वाढता धोका, स्मशानभूमी, रस्ते व ग्रामविकासाशी संबंधित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रलंबित पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करून नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच वन्यप्राण्यांमुळे शेतकरी व नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी गावाभोवती सुमारे २२ किलोमीटर लांबीचे सौर कुंपण उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची घोषणा आ. गायकवाड यांनी केली.
स्मशानभूमीसाठी जागेअभावी निर्माण झालेल्या समस्येवरही त्यांनी ग्रामस्थांना सहकार्याचे आवाहन केले. बैठकीत अनेक प्रश्नांवर जागेवरच निर्णय घेण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यांना वेळबद्ध पद्धतीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. या उपक्रमामुळे लोकप्रतिनिधी व प्रशासन थेट गावपातळीवर येऊन समस्या ऐकत असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.



