31.9 C
New York
Saturday, August 8, 2026

Buy now

spot_img

खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी अखेर बुलढाण्यात दाखल; पाणीटंचाईच्या संकटातून शहराला मोठा दिलासा…*

बुलढाणा ब्रेकिंग

*खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी अखेर बुलढाण्यात दाखल; पाणीटंचाईच्या संकटातून शहराला मोठा दिलासा…*

*आ. संजय गायकवाड यांची जलशुद्धीकरण केंद्रावर पाहणी; नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन..*

बुलढाणा शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अखेर खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी शहरात दाखल झाले असून शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज सकाळी खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी येळगाव जलाशयावर पोहोचल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली व सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला.
सध्या बुलढाणा शहराला येळगाव धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र धरणातील जलसाठा अत्यल्प होऊन तो मृत साठ्याच्या पातळीवर आल्याने शहराला मिळणारे पाणी मोठ्या प्रमाणात गाळयुक्त होत होते. या पाण्यावर अॅलम, ब्लीचिंग पावडर, क्लोरीन गॅस आणि पीएसी पावडरसह विविध रासायनिक प्रक्रिया करून ते शुद्ध करण्यात येत होते. जलसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्याने नगरपालिकेने खडकपूर्णा प्रकल्पावरून पाणी आणण्यासाठी मागील महिनाभर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले होते. आमदार संजय गायकवाड तसेच नगराध्यक्षा पूजाताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. दरम्यान, खडकपूर्णा प्रकल्पावर बसविण्यात आलेल्या ६५० एचपी क्षमतेच्या तीन मोटारपंपांमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. हायटेन्शन पॅनलमधील विद्युत वायर उंदरांनी कुरतडल्यामुळे पाणीपुरवठा सुरू करण्यात अडथळे निर्माण झाले होते. ही बाब लक्षात येताच आमदार गायकवाड यांनी तत्काळ संबंधित कंपनीशी संपर्क साधून पुणे येथील हितेश कंपनीच्या तांत्रिक पथकाला घटनास्थळी बोलावून घेतले. तसेच अकोला येथील महावीर इलेक्ट्रिकल्स व चिखली येथील ढवळे इलेक्ट्रिकल्स यांच्या सहकार्याने हायटेन्शन पॅनलची दुरुस्ती युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आली. त्यानंतर पंपिंग यंत्रणा सुरू करण्यात आली.
यासोबतच खडकपूर्णा-चिखली आणि चिखली-बुलढाणा या सुमारे ६० किलोमीटर लांबीच्या पाईपलाईन मार्गावरील विविध गळतीची कामेही नगरपालिकेच्या पथकाने तांत्रिक तज्ज्ञांच्या मदतीने पूर्ण केली. सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर आज सकाळपासून बुलढाणा शहरासाठी खडकपूर्णा प्रकल्पावरून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले. “खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी सुमारे ६० किलोमीटर अंतरावरून बुलढाण्यात पोहोचत आहे. त्यामुळे मार्गात काही तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून प्रशासनाला सहकार्य करावे,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी मुख्याधिकारी गणेश पांडे, उपाध्यक्ष गजेंद्र दांदडे, पाणीपुरवठा सभापती नयनप्रकाश शर्मा, नगरसेवक युनुस खान, प्रशांत जाधव, बबलू मावतवाल, योगेश परसे, निसार खान, रामेश्वर वावरे, अतुल लाहोटी, पाणीपुरवठा अभियंता राजेश गायकवाड यांच्यासह नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि तांत्रिक पथक उपस्थित होते. प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या संयुक्त प्रयत्नांमुळे बुलढाणा शहरातील पाणीटंचाईच्या संकटावर तात्पुरता दिलासा मिळाला असून आगामी काळात पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Related Articles

ताज्या बातम्या