बुलढाणा ब्रेकिंग
*तिकडे ‘मुंडे’ ब्रँडची धास्ती, इकडे गुटखा किंगची मस्ती!…*
*गुटखाबंदीचा बुलढाण्यात उडाला फज्जा; प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह..*
राज्यभर गुटखाबंदी कायदा लागू होऊन अनेक वर्षे उलटली असली तरी बुलढाणा जिल्ह्यात या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र समोर येत आहे. एका बाजूला राज्यात कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या धडक कारवायांमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले असताना, दुसऱ्या बाजूला बुलढाण्यात मात्र गुटखा विक्रीचा अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात गुटखाबंदी हा कायदा केवळ कागदावरच राहिल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये रंगू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुटखाबंदीमुळे गुटख्याची विक्री थांबण्याऐवजी उलट त्याचे दर अनेक पटींनी वाढले आहेत. याचा थेट फायदा गुटखा माफियांना होत असून, लाखो रुपयांची उलाढाल दररोज होत असल्याचे बोलले जात आहे. पूर्वी सहज उपलब्ध होणारा गुटखा आता चढ्या दराने विकला जात असून, त्यासाठी स्वतंत्र वितरण यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती समोर येत आहे…
*‘होम डिलिव्हरी’पर्यंत पोहोचले गुटखा रॅकेट…*
बुलढाणा जिल्ह्याला मध्यप्रदेश राज्याची सीमा लागून असल्याचा फायदा तस्करांकडून घेतला जात असल्याची चर्चा आहे. सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात गुटखा जिल्ह्यात आणला जात असून, विविध ठिकाणी गुप्त गोदामांमध्ये त्याचा साठा केला जातो. त्यानंतर एजंट आणि विक्रेत्यांच्या माध्यमातून किराणा दुकाने, पानटपऱ्या आणि इतर ठिकाणी माल पोहोचविला जातो. काही ठिकाणी तर मागणीनुसार थेट ‘होम डिलिव्हरी’ होत असल्याचेही सांगितले जात आहे…
*तरुणाईच्या आरोग्याशी सुरू आहे खेळ…*
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते गुटखा आणि तत्सम तंबाखूजन्य पदार्थ कर्करोगासह अनेक गंभीर आजारांना निमंत्रण देतात. तरीदेखील जिल्ह्यातील युवकांमध्ये गुटख्याचे वाढते व्यसन चिंतेचा विषय बनले आहे. बंदी असूनही सहज उपलब्धतेमुळे अनेक तरुण या विळख्यात अडकत असल्याचे दिसून येत आहे.
*अन्न व औषध प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न…*
या संपूर्ण प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. वेळोवेळी कारवाया होत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात गुटख्याची विक्री थांबलेली दिसत नाही. त्यामुळे या कारवाया केवळ दिखाऊ आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित विभागाच्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी केली आहे…
*जिल्हावासीयांची कठोर कारवाईची मागणी..*
गुटखा तस्करी आणि विक्रीचे संपूर्ण जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची मागणी आता जोर धरत आहे. केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता या अवैध व्यवसायामागील मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
गुटखाबंदीचा कायदा प्रत्यक्षात कधी राबविला जाणार आणि गुटखा माफियांवर निर्णायक कारवाई कधी होणार, याकडे आता संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



