बुलढाणा ब्रेकिंग
*भरदिवसा सोनसाखळी हिसकावली; दोन चोरट्यांचा महिलेने केला सिनेस्टाईल पाठलाग!*
*पोलीस स्टेशनसमोरूनच पसार झाले चोरटे; जयस्तंभ चौकातील गर्दीचा घेतला फायदा*
बुलढाणा शहरातील कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणारी धक्कादायक घटना आज सायंकाळी कोर्ट रोड परिसरात घडली. दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून क्षणार्धात पळ काढला. मात्र घाबरून न जाता संबंधित महिलेने आपल्या दोन लहान चिमुकल्यांसह स्कुटीवरून चोरट्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करत धाडसाचे दर्शन घडवले.
मिळालेल्या माहितीनुसार, कोर्ट रोड परिसरात महिला आपल्या कामानिमित्त जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी तिच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावली आणि भरधाव वेगाने पळ काढला. अचानक घडलेल्या या प्रकारानंतर महिलेने मोठ्याने आरडाओरड करत आपल्या स्कुटीवरून चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. विशेष म्हणजे, ही महिला चोरट्यांच्या मागे ओरडत-ओरडत थेट बुलढाणा शहर पोलीस स्टेशनसमोरून गेली. तिचा आवाज ऐकून पोलिसांनीही तत्काळ हालचाल करत चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी वेग आणि गर्दीचा फायदा घेत पोलिसांना गुंगारा दिला. चोरटे जयस्तंभ चौक परिसरात पोहोचल्यानंतर तेथील गर्दीचा फायदा घेत पसार झाले. त्यामुळे काही अंतरापर्यंत पाठलाग करूनही महिला आणि पोलिसांच्या हाती आरोपी लागले नाहीत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून कोर्ट रोड परिसरासह चोरटे ज्या मार्गाने पसार झाले त्या संपूर्ण मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे. आरोपींची ओळख पटवून त्यांना लवकरच जेरबंद करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, शहराच्या मध्यवर्ती भागात आणि पोलीस स्टेशनच्या परिसरातच घडलेल्या या धाडसी चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.



