बुलढाणा ब्रेकिंग
*”माझ्या लेकराला काही झालं तर सरकारला आईचा शाप लागेल!” – रविकांत तुपकर यांच्या आईच्या अश्रूंनी व्यक्त केली वेदना..*
*”मुलाची प्रकृती बिघडली तर सरकार कोसळेल!” – तुपकरांच्या आईचा संताप; सरकारवर दुर्लक्षाचा गंभीर आरोप…*
सरसकट शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस असून त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. सरकारकडून अद्याप आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने तुपकर यांच्या आईने अत्यंत उद्विग्न आणि संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
“माझ्या मुलाची प्रकृती आणखी बिघडली, त्याला काही झालं तर सरकारला माझा तडतळात लागेल. हे सरकार टिकणार नाही. मायबाप सरकार म्हणून आम्ही अपेक्षा ठेवली, पण हे सत्ताधारी उंटावरचे शहाणे बनून बसले आहेत,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
गेल्या चार दिवसांपासून अन्नाचा कणही न घेत आंदोलनावर ठाम असलेल्या रविकांत तुपकर यांच्या प्रकृतीत बिघाड होत असल्याची माहिती समोर येत आहे. तरीही शासनाकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे.
एकीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मुलगा जीवाची बाजी लावत असताना दुसरीकडे आईच्या डोळ्यांतून अश्रू आणि मनात संताप उसळत असल्याचे चित्र आंदोलनस्थळी पाहायला मिळत आहे. तुपकर यांच्या आईच्या या भावनिक प्रतिक्रियेमुळे आंदोलनाला आणखी भावनिक आणि आक्रमक वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, तुपकर यांच्या प्रकृतीची चिंता वाढत असतानाच शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जात आहे.



