33.2 C
New York
Friday, August 7, 2026

Buy now

spot_img

बुलढाणा पोलिसांची 2026 मध्ये धडाकेबाज कामगिरी; 19 कोटींपेक्षा अधिक मुद्देमाल जप्त*

बुलढाणा ब्रेकिंग

*बुलढाणा पोलिसांची 2026 मध्ये धडाकेबाज कामगिरी; 19 कोटींपेक्षा अधिक मुद्देमाल जप्त*

*‘मिशन परिवर्तन’पासून गुन्हे उकलपर्यंत बुलढाणा पोलिसांचा दबदबा; 79 टक्के गुन्ह्यांची उकल..*

पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने वर्ष 2026 मध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावत गुन्हे उकल, अवैध धंद्यांवर कारवाई, अमली पदार्थ विरोधी मोहिमा तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यात मोठे यश मिळवले आहे. जिल्हा पोलीस दलाने विविध कारवायांमधून तब्बल 19 कोटी 19 लाख 15 हजार 607 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जिल्ह्यात खून, दरोडे, जबरी चोरी, घरफोडी आदी गंभीर गुन्ह्यांपैकी 79 टक्के गुन्ह्यांची यशस्वी उकल करण्यात आली असून 4 कोटी 7 लाख 61 हजार 329 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अमली पदार्थांविरोधात राबविण्यात आलेल्या ‘मिशन परिवर्तन’ अंतर्गत 55 गुन्हे दाखल करून 58 आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत 324.846 किलो गांजा व इतर अमली पदार्थांसह 1 कोटी 99 लाख 78 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तसेच अवैध दारू व जुगाराविरोधात मोठी मोहीम राबवत मद्य कायद्यानुसार 1981 गुन्हे दाखल करून 66 लाख 62 हजार 357 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार प्रकरणांमध्ये 842 गुन्हे दाखल करून 40 लाख 24 हजार 303 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
आर्म अॅक्ट अंतर्गत 19 गुन्ह्यांमध्ये पिस्तूल, काडतुसे, तलवारी, चाकू, रायफल यांसारखी शस्त्रे जप्त करण्यात आली असून 45 लाख 96 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत 6 गुन्हे दाखल करून 12 आरोपींना अटक करण्यात आली, तर शासन प्रतिबंधित गुटखा प्रकरणांमध्ये 14 आरोपींना अटक करून 1 कोटी 8 लाख 39 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अपहरण व मिसिंग प्रकरणांतही पोलिसांना यश मिळाले असून 110 अपहरण प्रकरणांतील 91 व्यक्तींची सुखरूप सुटका करण्यात आली. तसेच हरवलेल्या 718 व्यक्तींपैकी 512 जणांचा शोध लावण्यात आला आहे.

वाहतूक शाखेनेही मोठी कारवाई करत 55 हजार 929 प्रकरणांमध्ये कारवाई करून 4 कोटी 14 लाख 46 हजार 450 रुपयांचा दंड वसूल केला. ड्रंक अँड ड्राइव्हचे 112 गुन्हे नोंदवण्यात आले.

सायबर गुन्ह्यांमध्ये नागरिकांना दिलासा देत फसवणुकीतील तब्बल 17 लाख 28 हजार 138 रुपये तक्रारदारांना परत मिळवून देण्यात आले. NCCRP पोर्टलद्वारेही अनेक तक्रारी निकाली काढण्यात आल्या.

याशिवाय कम्युनिटी पोलिसिंग उपक्रमांतर्गत जनजागृती मोहिमा, शाळांना भेटी, महिलां व बालकांबाबत जागरूकता कार्यक्रम, सायकल रॅली तसेच आपत्कालीन क्रमांक 112 बाबत जनजागृती करण्यात आली.

पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा पोलीस दलाने केलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यात गुन्हेगारीवर मोठा आळा बसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या