देऊळगाव राजात आरक्षण बचावासाठी एल्गार; १३ जुलै रोजी भव्य मोर्चाचे आयोजन…
अनुसूचित जातींच्या आरक्षणावर घाला घालण्याच्या प्रयत्नांविरोधात उपवर्गीकरण विरोधी समिती आक्रमक…
देऊळगाव राजा
अनुसूचित जातींच्या आरक्षणावर कोणताही आघात होऊ देणार नाही आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न हाणून पाडला जाईल, असा निर्धार व्यक्त करत देऊळगाव राजा तालुक्यातील उपवर्गीकरण विरोधी समितीच्या वतीने १३ जुलै २०२६ रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. “जय भीम जय संविधान” या घोषणांनी सजलेल्या पोस्टरमधून संविधान आणि आरक्षण बचावाचा संदेश देण्यात आला आहे.
समितीच्या वतीने जारी करण्यात आलेल्या आवाहनात संविधानाने दिलेल्या घटनात्मक अधिकारांवर गदा आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला असून, अनुसूचित जाती समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन एकजुटीची ताकद दाखवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू होणार असून महात्मा ज्योतिबा फुले बस स्टँड चौक येथे समारोप होणार आहे. मोर्चामध्ये संविधान, सामाजिक न्याय आणि आरक्षण संरक्षणाच्या मागण्यांवर भर दिला जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
“एकता आमची, शक्ती आमची, संविधान आमचा श्वास” असा संदेश देत समाजातील विविध घटकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे देऊळगाव राजा परिसरात सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



