33.8 C
New York
Friday, August 7, 2026

Buy now

spot_img

यूपीएससीत बुलढाण्याचा झेंडा; सागर उज्जैनकर यांची जिल्हा युवा वर्ग-१ अधिकारीपदी निवड…

बुलढाणा ब्रेकिंग

यूपीएससीत बुलढाण्याचा झेंडा; सागर उज्जैनकर यांची जिल्हा युवा वर्ग-१ अधिकारीपदी निवड…

अपयशावर मात करत सागर उज्जैनकर यांचे घवघवीत यश; युवक कल्याण विभागात मिळविले मानाचे पद…

बुलढाणा शहरातील सागर संगीता रुपराव उज्जैनकर यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत भारत सरकारच्या युवक कल्याण विभागात जिल्हा युवा वर्ग-१ अधिकारी पदावर निवड मिळविली आहे. त्यांच्या या यशामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून जिल्ह्यात सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सागर उज्जैनकर यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बुलढाणा येथील भारत विद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी शिवाजी विद्यालय, बुलढाणा येथून इयत्ता अकरावी-बारावीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे गुरु गोविंद सिंह शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नांदेड येथून त्यांनी अभियांत्रिकी (बी.टेक.) पदवी संपादन केली. अभियांत्रिकी शिक्षणानंतर त्यांनी पुणे येथील ज्ञान प्रबोधिनी अकॅडमीमध्ये यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. याच काळात त्यांनी एलएलबीची पदवीही यशस्वीरित्या प्राप्त केली.
यूपीएससीच्या सुरुवातीच्या प्रयत्नांमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र अपयशाने खचून न जाता त्यांनी अधिक जोमाने अभ्यास सुरू ठेवला. अखेर २०२४ च्या यूपीएससी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत भारत सरकारच्या युवक कल्याण विभागात जिल्हा युवा वर्ग-१ अधिकारी पदावर निवड होऊन त्यांनी आपल्या मेहनत, चिकाटी आणि जिद्दीचे सार्थक केले.
आपल्या यशाचे श्रेय सागर यांनी आई-वडील, भाऊ-बहिण, शिक्षक, मार्गदर्शक आणि मित्रपरिवार यांच्या मोलाच्या सहकार्याला दिले आहे. त्यांच्या यशाची बातमी समजताच बुलढाणा शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सागर यांच्या शहरात आगमनानंतर मित्रपरिवार, नातेवाईक आणि नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत करत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या या यशामुळे बुलढाणा जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा आणि आत्मविश्वास मिळाला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या