*जळगाव जामोदमध्ये अवैध गुटखा विक्रीविरोधात शिवसेना आक्रमक; प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम..*
*“गुटखा माफियांवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन छेडू” ; जिल्हाप्रमुख गजानन वाघांचा इशारा.*
बुलढाणा ब्रेकिंग
जळगाव जामोद शहरात सुरू असलेल्या अवैध गुटखा तस्करी आणि विक्रीच्या विरोधात शिवसेना (उबाठा) आक्रमक झाली असून, अन्न व औषध प्रशासन विभागाला थेट १५ दिवसांचा इशारा देण्यात आला आहे. बुलढाणा जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक उपायुक्त पाटील साहेब यांची भेट घेऊन या गंभीर प्रकाराबाबत सविस्तर निवेदन सादर केले.
शहरात मोठ्या प्रमाणावर बंदी असलेल्या गुटख्याची खुलेआम विक्री सुरू असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. या प्रकरणात काही राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्यामुळे दररोज लाखो रुपयांचा गुटखा मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथून जळगाव जामोद शहरात आणला जात असल्याचा गंभीर आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
बोलेरो पिकअप वाहनांच्या माध्यमातून गुटखा शहरात आणला जात असून, त्यानंतर दुचाकी आणि ऑटोच्या सहाय्याने गल्लीबोळात छुप्या पद्धतीने त्याची विक्री केली जात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सीमावर्ती भाग आणि डोंगराळ रस्त्यांचा फायदा घेत तस्कर सर्रास वाहतूक करत असून, या मार्गांवर आरटीओ चेकपोस्ट किंवा पोलिसांचा प्रभावी बंदोबस्त नसल्याने तस्करीला अधिकच ऊत आल्याचा आरोप करण्यात आला.
यासोबतच स्थानिक किराणा दुकानांमध्ये भेसळयुक्त खाद्यपदार्थ आणि मालाची विक्री होत असल्याची बाबही समोर आली आहे. मात्र, आजपर्यंत संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) बुलढाणा जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे. “येत्या १५ दिवसांच्या आत गुटखा माफिया आणि भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली नाही, तर संबंधित कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, या निवेदनाच्या प्रती अन्न व औषध प्रशासन आयुक्त, मुंबई तसेच स्थानिक प्रसारमाध्यमांनाही पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि प्रत्यक्ष कारवाई होते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



