बुलढाणा ब्रेकिंग
*मोताळा तालुका खामगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यक्षेत्रातून वगळा, उबाठा शिवसेनेची विभागीय आयुक्तांकडे ठाम मागणी*
*बुलढाण्याशी भौगोलिक व प्रशासकीय जवळीक लक्षात घेऊन मोताळा तालुका बुलढाणा कार्यक्षेत्रातच कायम ठेवण्याची मागणी; अहवाल शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन*
प्रस्तावित खामगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातून मोताळा तालुका वगळून तो बुलढाणा कार्यक्षेत्रातच कायम ठेवण्यात यावा, अशी ठाम मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी अमरावती येथे विभागीय आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे. यावेळी मोताळा तालुक्याची भौगोलिक, प्रशासकीय तसेच जनसुविधांच्या दृष्टीने बुलढाणा शहराशी असलेली जवळीक विभागीय आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि प्रशासन अधिक सुलभ ठेवण्यासाठी मोताळा तालुका बुलढाणा कार्यक्षेत्रातच कायम ठेवणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. या विषयावर विभागीय आयुक्तांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली. तसेच, नागरिकांच्या हिताचा विचार करून शासनाकडे यासंदर्भातील अहवाल पाठविण्यात येईल, असे आश्वासन विभागीय आयुक्तांनी दिल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, प्रस्तावित प्रशासकीय बदलामुळे मोताळा तालुक्यातील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने स्थानिकांची भूमिका विचारात घेऊन अंतिम निर्णय घ्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली….



