बुलढाणा
“प्रत्येक गावात पर्जन्यमापक यंत्रणा कधी बसणार?; महिनाभरात काम पूर्ण करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा”
शेतकरी योद्धा कृती समितीचे तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन; बंद यंत्रणांमुळे शेतकरी पीक विमा व मदतीपासून वंचित झाल्याचा आरोप
सिंदखेडराजा तालुक्यातील बंद व अकार्यक्षम पर्जन्यमापक यंत्रणा तात्काळ सुरू करून प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत नवीन पर्जन्यमापक यंत्रणा बसविण्याची मागणी शेतकरी योद्धा कृती समिती, जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी, सिंदखेडराजा यांना निवेदन देत एका महिन्याच्या आत मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र लोकशाही आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा आणि लोणार या तीनही तालुक्यांतील पर्जन्यमापक यंत्रणांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. अनेक निवेदने, आंदोलने आणि पत्रकार परिषदेनंतरही प्रशासनाने ठोस कार्यवाही केलेली नाही. किनगाव राजा येथील पर्जन्यमापक यंत्रणा बंद असल्याची नोंद संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणीत केली होती. त्यानंतर प्रत्येक ग्रामपंचायतीत नवीन यंत्रणा बसविण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.
संघटनेने आरोप केला आहे की, बंद पर्जन्यमापक यंत्रणांमुळे मागील वर्षी अतिवृष्टीची अचूक नोंद झाली नाही. परिणामी अनेक शेतकरी पीक विमा तसेच नैसर्गिक आपत्तीच्या मदतीपासून वंचित राहिले. प्रत्यक्षात हजारो एकर शेतीचे नुकसान झाल्याची पाहणी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी केली होती. त्यामुळे नुकसान दिसत असताना त्याची नोंद पर्जन्यमापक यंत्रणेत का झाली नाही, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
शेतकरी योद्धा कृती समितीने सर्व बंद पर्जन्यमापक यंत्रणा तातडीने सुरू कराव्यात, प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत नवीन यंत्रणा बसवावी, दररोजचा पर्जन्यमान अहवाल सार्वजनिक करावा तसेच ही योजना रखडण्यामागील कारणांची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
निवेदनानंतर एका महिन्याच्या आत मागण्या पूर्ण न झाल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सिंदखेडराजा येथे लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल. वारंवार आश्वासने देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवावी, अन्यथा कृषी विभागाच्या शेतकरीविरोधी भूमिकेविरोधात व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा शेतकरी योद्धा कृती समितीने दिला आहे.



