बुलढाणा ब्रेकिंग
*शिक्षक द्या… नाहीतर शाळेला कुलूप ठोकू!…*
*पातुर्डा बुद्रुक येथील पीएम श्री शाळेत १३ शिक्षकांची पदे रिक्त; १५ गावांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर..*
संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा बुद्रुक येथील पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या गंभीर टंचाईमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठे संकट ओढवले आहे. शाळेसाठी एकूण २२ शिक्षकांची पदे मंजूर असताना त्यापैकी तब्बल १३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सुमारे १५ गावांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले आहे. शिक्षकांच्या कमतरतेमुळे उपलब्ध शिक्षकांवर अतिरिक्त ताण पडला असून, अनेक ठिकाणी एकाच वेळी दोन ते तीन वर्ग एकत्र बसवून शिकवण्याची वेळ आली आहे. इंग्रजी, गणित आणि विज्ञान यांसारख्या महत्त्वाच्या विषयांच्या अध्यापनावर याचा सर्वाधिक परिणाम होत असल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होण्याबाबत पालक आणि ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. शाळा प्रशासनाने रिक्त पदे भरण्याबाबत मागील वर्षभरापासून संबंधित विभागाकडे वारंवार लेखी तसेच तोंडी पाठपुरावा केल्याचे सांगितले जाते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप शाळा व्यवस्थापन समितीने केला आहे. यामुळे संतप्त झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीने प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या कालावधीत शिक्षकांची रिक्त पदे न भरल्यास शाळेला कुलूप ठोकून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा समितीचे अध्यक्ष विष्णू पाटील, सदस्य आणि ग्रामस्थांनी दिला आहे. एकीकडे शासनाकडून गुणवत्तापूर्ण शिक्षण, कॉपीमुक्त परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट मांडले जात असताना, दुसरीकडे शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा सवाल पालक आणि नागरिक उपस्थित करत आहेत. आता प्रशासन या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन रिक्त पदे भरणार की विद्यार्थ्यांच्या भवितव्याकडे दुर्लक्ष करणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.



