बुलढाणा ब्रेकिंग
*बुलढाण्याच्या सुपुत्राची जागतिक विज्ञानविश्वात दमदार झेप; सातवीतील विद्यार्थ्याचे ‘टाइम रेझिस्टन्स थिअरी’ संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित…*
*‘क्वांटम ग्रॅव्हिटी’सारख्या क्लिष्ट समस्येवर बालशास्त्रज्ञांची नवी मांडणी; कोलारा गावचा निधीश सोळंकी जगभर चर्चेत…*
बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानाची बातमी… अवघ्या सातवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने जागतिक विज्ञानविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. भौतिकशास्त्रातील अत्यंत गुंतागुंतीच्या आणि आजही पूर्णपणे न सुटलेल्या ‘क्वांटम ग्रॅव्हिटी’ या समस्येवर संशोधन करत बुलढाण्याच्या सुपुत्राने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी निधीश सोळंकी आणि त्याचा सहकारी अर्णव खापर्डे यांनी मांडलेली ‘टाइम रेझिस्टन्स थिअरी’ ही संशोधनात्मक संकल्पना युरोपियन संशोधन व्यासपीठ ‘झेनोडो’ आणि ‘इंटरनॅशनल जर्नल फॉर मल्टीडिसिप्लिनरी रिसर्च’मध्ये प्रकाशित झाली असून, या दोन्ही बालशास्त्रज्ञांचे जगभरातून कौतुक होत आहे….
भौतिकशास्त्रातील ‘क्वांटम ग्रॅव्हिटी’ हा विषय आजही जगातील सर्वात कठीण आणि अनुत्तरित संशोधन क्षेत्रांपैकी एक मानला जातो. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी मांडलेल्या ‘सामान्य सापेक्षता’ सिद्धांताने आधुनिक भौतिकशास्त्राला नवी दिशा दिली. मात्र, गुरुत्वाकर्षण आणि क्वांटम यांत्रिकी या दोन मूलभूत सिद्धांतांचा परस्पर संबंध स्पष्ट करणारा एकसंध सिद्धांत अद्यापही विकसित झालेला नाही. हीच समस्या ‘क्वांटम ग्रॅव्हिटी’ म्हणून ओळखली जाते. अशा अत्यंत क्लिष्ट विषयावर अवघ्या सातवीत शिकणाऱ्या निधीश सोळंकी आणि अर्णव खापर्डे या विद्यार्थ्यांनी स्वतंत्र संशोधन करत ‘टाइम रेझिस्टन्स थिअरी’ हा नवा दृष्टिकोन मांडला आहे. त्यांच्या या संशोधनाची दखल थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली असून, युरोपियन संशोधन व्यासपीठ Zenodo आणि International Journal for Multidisciplinary Research या प्रतिष्ठित व्यासपीठांवर त्यांचे संशोधन प्रकाशित झाले आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेची जागतिक स्तरावर पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे बुलढाणा जिल्ह्याचे नावही जागतिक विज्ञानविश्वात झळकले आहे. निधीश सोळंकी हा बुलढाणा जिल्ह्यातील श्री सिद्धेश्वर भगवंताची पावन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोलारा गावचा मूळ रहिवासी आहे. तो कोलारा येथील उद्योजक तथा निकोस प्रा. लिमिटेडचे संचालक वसंत सोळंकी आणि डॉ. कविता सोळंकी यांचा सुपुत्र आहे. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्याने जागतिक संशोधन व्यासपीठावर पोहोचत विज्ञान क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे. वयाच्या अवघ्या १२ ते १३ वर्षांत इतक्या उच्च पातळीवरील संशोधन करून निधीश आणि अर्णव यांनी अनेक प्रस्थापित संशोधकांचेही लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्या संशोधनामुळे भविष्यात ‘क्वांटम ग्रॅव्हिटी’सारख्या गुंतागुंतीच्या विषयावर नवे संशोधन होण्यास प्रेरणा मिळू शकते, असा विश्वास विज्ञान क्षेत्रातील अभ्यासक व्यक्त करत आहेत. या अभूतपूर्व यशाबद्दल वैज्ञानिक, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, विद्यार्थी, तसेच बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांकडून निधीश सोळंकी आणि अर्णव खापर्डे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. बुलढाण्याच्या या सुपुत्राने आपल्या बुद्धिमत्ता, जिद्द आणि संशोधन वृत्तीच्या जोरावर जागतिक स्तरावर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले असून, ही कामगिरी संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरत आहे…..



