बुलढाणा फ्लॅश ( खामगाव )
*२९ जुलैच्या बुलढाणा मोर्चासाठी खामगावात जोरदार तयारी; अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीची बैठक उत्साहात संपन्न..*
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, खामगाव यांच्या वतीने २९ जुलै रोजी बुलढाणा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोर्चाच्या तयारीसाठी महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी भरघोस आर्थिक मदत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मोर्चाच्या व्यापक प्रसार आणि प्रचारासाठी पत्रके, फ्लेक्स बॅनर्स, वाहन व्यवस्था आणि जनसंपर्क अभियानाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. खामगाव कृती समितीच्या वतीने बुलढाणा येथील मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी व्हावेत, यासाठी स्थानिक स्तरावर व्यापक नियोजन करण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. संपूर्ण बैठक उत्स्फूर्त वातावरणात पार पडली असून उपस्थितांनी मोर्चा यशस्वी करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीचे प्रस्ताविक आणि नियोजन उद्योजक गौतम गवई यांनी केले. यावेळी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक व्ही. एम. भोजने, प्रा. डॉ. एम. आर. इंगळे, चर्मकार संघटनेच्या राष्ट्रीय सल्लागार उर्मिलाताई ठाकरे, माजी रजिस्ट्रार सुखदेवराव शेगोकार, आंबेडकरी अभ्यासक व पंचायत समितीचे माजी उपसभापती अंबादास वानखडे, कृषी उत्पन्न बाजार समिती, खामगावचे उपसभापती व युवक नेते संघपाल जाधव, प्रकाश दांडगे, भारतीय बौद्ध महासभेचे दादाराव हेलोडे, भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश धुंधळे, रिपब्लिकन सेनेचे भीमराव गवई (ॲड.), रविभाऊ माळवंदे, प्रशांत दमदाळे, गजानन आठवले, प्रकाश इंगळे, मनोज पानझाडे, अरविंद वाकोडे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत २९ जुलैच्या बुलढाणा मोर्चात खामगाव तालुक्यातून विक्रमी जनसमुदाय सहभागी करून घेण्यासाठी गावागावांत जनजागृती मोहीम राबविणे, वाहनांचे नियोजन करणे आणि आर्थिक सहकार्य वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला. उपस्थितांनी मोर्चा यशस्वी करण्यासाठी एकमुखाने सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.



