बुलढाणा ब्रेकिंग
*उपवर्गीकरण विरोधात २९ जुलैला बुलढाण्यात भव्य मोर्चा; ग्रामीण भागात जनजागृतीला वेग*
*कोलवड येथे तरुणांची बैठक; मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन*
अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात येत्या २९ जुलै रोजी बुलढाणा जिल्हा मुख्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात जिल्ह्यातील ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने महिला, पुरुष, युवक व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, यासाठी कृती समितीच्या वतीने विविध गावांमध्ये जनजागृती बैठका आयोजित करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर कोलवड येथे तरुणांची विशेष बैठक पार पडली. बैठकीत उपवर्गीकरणाच्या निर्णयाचे सामाजिक परिणाम, आरक्षणाच्या मूलभूत तत्त्वांवर होणारा परिणाम तसेच संविधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी एकजूट होण्याची गरज यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान उपस्थित युवकांना २९ जुलै रोजी बुलढाणा येथे होणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच प्रत्येक गावातून युवक, महिला आणि नागरिकांना संघटित करून मोर्चा यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्याचे आवाहनही करण्यात आले. कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, हा मोर्चा शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने काढण्यात येणार असून अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. त्यामुळे आगामी काही दिवसांत ग्रामीण भागातील गावोगावी बैठका, जनसंपर्क मोहीम आणि प्रचार अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.



