बुलढाणा ब्रेकिंग
*उपवर्गीकरणाविरोधात 29 जुलैला बुलढाण्यात ऐतिहासिक महामोर्चा; लाखोंच्या उपस्थितीचे आवाहन*
*जिल्ह्यातील अनुसूचित जातींतील 58 जातीतील जनसमुदायानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे; आ. सिद्धार्थ खरात यांचे आवाहन*
अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात येत्या 29 जुलै रोजी बुलढाणा शहरात ‘भूतो न भविष्यति’ असा भव्य महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती देत, या मोर्चात जिल्ह्यातील 58 अनुसूचित जातींतील लाखो महिला, पुरुष आणि तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार सिद्धार्थ खरात यांनी केले आहे. उपवर्गीकरणाच्या निर्णयामुळे सामाजिक न्याय आणि संविधानाने दिलेल्या समान हक्कांवर परिणाम होणार असल्याची भूमिका कृती समितीने मांडली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात जनजागृती बैठका, संपर्क अभियान आणि नियोजन सुरू असून, प्रत्येक गावातून मोठ्या संख्येने नागरिक मोर्चात सहभागी होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. आ. सिद्धार्थ खरात यांनी सांगितले की, हा मोर्चा केवळ एका समाजाचा नसून संविधानिक हक्क आणि सामाजिक न्यायाच्या संरक्षणासाठीचा लढा आहे. त्यामुळे सर्व समाजबांधवांनी मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने या आंदोलनात सहभागी व्हावे. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकतेची ताकद दाखवावी, असे त्यांनी आवाहन केले. 29 जुलै च्या या महामोर्चासाठी जिल्ह्यातील 13 ही तालुक्यांमध्ये जोरदार तयारी सुरू असून, मोठ्या संख्येने नागरिक बुलढाण्यात दाखल होणार असल्याने हा मोर्चा जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आंदोलनांपैकी एक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे….



