बुलढाणा ब्रेकिंग
*देऊळगावराजात मातंग समाजाचा भव्य आक्रोश मोर्चा; उपवर्गीकरण लागू करण्याची जोरदार मागणी*
*”आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे”; हजारोंच्या उपस्थितीत देऊळगावराजा घोषणांनी दणाणला*
अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण तात्काळ लागू करून आरक्षणाचा लाभ मातंग व मेहतर समाजाला मिळावा, या प्रमुख मागणीसाठी देऊळगावराजा येथे सकल मातंग समाजाच्या वतीने रविवारी भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात हजारो महिला, पुरुष आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बाजार समिती परिसरातून सुरू झालेला हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत बसस्थानक चौकात धडकला. “आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे”, “उपवर्गीकरण लागू करा”, “मातंग-मेहतर समाजाला न्याय द्या” अशा घोषणांनी संपूर्ण बालाजी नगरी दुमदुमून गेली.
या मोर्चामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच समाजातील विविध मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
मोर्च्याचे रूपांतर बसस्थानक चौकातील सभेत झाले. यावेळी विविध वक्त्यांनी उपवर्गीकरणाच्या मागणीवर ठाम भूमिका मांडत, मातंग व मेहतर समाजाला आरक्षणाचा न्याय्य लाभ मिळण्यासाठी राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
यावेळी वक्त्यांनी स्पष्ट केले की, “आमचा आमच्या मोठ्या भावांशी कोणताही संघर्ष नाही. आम्ही कोणाच्याही विरोधात नसून, संविधानाने दिलेल्या हक्काच्या आरक्षणासाठी लढत आहोत.” समाजाला न्याय मिळावा आणि अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण तातडीने लागू करावे, अशी एकमुखी मागणी सभेतून करण्यात आली.
मोर्चादरम्यान शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या आक्रोश मोर्चामुळे देऊळगावराजा शहराचे लक्ष उपवर्गीकरणाच्या मागणीकडे वेधले गेले.



