बुलढाणा ब्रेकिंग
*आमदार सिद्धार्थजी खरात यांच्या वाढदिवसानिमित्त मेहकरमध्ये महाआरोग्य शिबिरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन…*
*मेहकरमध्ये १६ ते १८ ऑगस्टदरम्यान आरोग्य शिबिर, साहित्यिकांची मेजवानी आणि ‘एक शाम मो. रफी के नाम’ गीतगायन स्पर्धा..*
एकता ग्रुप, मेहकर यांच्या वतीने मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. सिद्धार्थजी खरात साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता श्री संत गजानन महाराज मंदिर, मेहकर येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात विविध आजारांची मोफत तपासणी तसेच मोफत औषधोपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
यानंतर सोमवार, १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता कृषी वैभव लॉन, मेहकर येथे ‘मंदियाळी साहित्यिकांची मेजवानी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी साहित्यिकांची गझल आणि कवितांची मैफल रंगणार असून, रसिकांना साहित्यिक कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे.
मंगळवार, १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता कृषी वैभव लॉन येथे ‘यादे रखी गीत गायन स्पर्धा २०२६ – एक शाम मो. रफी के नाम’ या गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुष व महिला अशा दोन विभागांत ही स्पर्धा होणार आहे.
पुरुष विभागात प्रथम क्रमांकासाठी ११ हजार रुपये, द्वितीय ७ हजार, तृतीय ५ हजार आणि चतुर्थ ३ हजार रुपये अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. महिला विभागात प्रथम क्रमांकासाठी ७ हजार, द्वितीय ५ हजार आणि तृतीय ३ हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय पाच स्पर्धकांना प्रत्येकी १ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेची प्रवेश फी १०० रुपये असल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे.
या सर्व कार्यक्रमांना विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार असून, नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन एकता ग्रुप, मेहकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.



