बुलढाणा ब्रेकिंग
*जयस्तंभ चौकात पोस्टरवरून मध्यरात्री राडा! कार्यकर्त्यांना शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी..*
*मुख्यमंत्री फडणवीसांचे स्वीय सचिव विद्याधर महालेंच्या वाढदिवसाच्या पोस्टरवरून वाद; विक्की आव्हाडसह ७-८ जणांवर गुन्हा*
बुलढाणा शहरातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच जयस्तंभ चौकात वाढदिवसाच्या शुभेच्छांचे पोस्टर लावण्यावरून मध्यरात्री जोरदार वाद झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सचिव विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्टर लावणाऱ्या कार्यकर्त्यांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसांनी विक्की आव्हाड यांच्यासह ७ ते ८ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
एफआयआरनुसार, विद्याधर महाले मित्रमंडळाचे सदस्य मंदार बाहेकर हे प्रमोद गावंडे, मुन्नाभाऊ बँडवाल, कौस्तुभ पाटील आणि मजुरांसह ३० ऑगस्ट रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता जयस्तंभ चौकातील गांधी भवनासमोर पोस्टर लावत होते. नगर परिषदेकडून परवानगी घेऊन पोस्टर लावण्याचे काम सुरू असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. याच वेळी काही व्यक्ती वाहनातून घटनास्थळी आल्या. त्यांनी “तुम्ही पोस्टर कसे लावता?” असा जाब विचारत कार्यकर्ते व मजुरांना अश्लील शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली आणि पोस्टर लावण्यापासून रोखल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात अपराध क्रमांक ८३३/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९, २९६ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मल्लिकार्जुन वाघमोडे करीत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात पोस्टर लावण्यावरून झालेला हा वाद आता राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे. राजकीय मतभेद असतील, स्पर्धा असेल; मात्र पोस्टर लावण्यावरून थेट धमकी आणि दादागिरीचे आरोप होत असतील, तर या प्रकारामागचे नेमके कारण काय? याकडे आता पोलिस तपासातून काय समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.



