बुलढाणा ब्रेकिंग
मलकापूर ग्रामीणमध्ये विवाहेत्तर अत्याचार व जबरी चोरीच्या गुन्ह्याची उकल; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
महिलेच्या घरात घुसून पतीला धमकावले, मोबाईल व रोकड लुटली; दोन २२ वर्षीय आरोपी पोलिसांच्या ताब्यात..
मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरीसह विवाहेत्तर अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्याची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वी उकल केली आहे. या प्रकरणात मध्यप्रदेशातील दोन २२ वर्षीय आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार तसेच फिर्यादीच्या पतीचा जबरीने चोरून नेलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जुलै २०२६ रोजी १९ वर्षीय महिलेने मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. १७ जुलैच्या रात्री सुमारे ११ वाजता ती आपल्या पतीसोबत निंबुती सोपान भारंगे यांच्या ग्राम दुधलगाव शिवारातील शेतातील घरात झोपलेली होती. यावेळी तोंडाला रुमाल बांधलेल्या दोन अनोळखी इसमांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला.
आरोपींनी फिर्यादी व तिच्या पतीला विळ्याचा धाक दाखवत धमकावले. त्यानंतर फिर्यादीच्या पतीचा रेडमी 5G कंपनीचा मोबाईल तसेच ६०० रुपये रोख जबरीने घेतले. एवढ्यावर न थांबता आरोपींनी फिर्यादी व तिच्या पतीला शेतामध्ये नेऊन पुन्हा विळ्याचा धाक दाखवला. यानंतर एका आरोपीने फिर्यादीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली.
या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेचा समांतर तपास
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाबाबत मार्गदर्शन केले. आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश देण्यात आले.
प्राथमिक तपासात आरोपींची ओळख स्पष्ट झाली नव्हती. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा आणि मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने स्वतंत्रपणे तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे, साक्षीदारांकडे चौकशी करणे, संशयितांची माहिती घेणे, डीएनए नमुने तपासणे तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपींपर्यंत धागेदोरे पोहोचवले.
दोन आरोपी जेरबंद
तपासाअंती पोलिसांनी राकेश महेंद्रसिंग भिल्लाला (वय २२, रा. जामठी, ता. जि. बुरहानपूर, मध्यप्रदेश) आणि जामसिंग रोशन भिल्लाला (वय २२, रा. जामठी, ता. जि. बुरहानपूर, मध्यप्रदेश) यांना संशयित म्हणून निष्पन्न केले.
राकेश महेंद्रसिंग भिल्लाला हा मध्यप्रदेशातील दापोरा (शहापूर), जिल्हा बुरहानपूर येथून, तर जामसिंग रोशन भिल्लाला हा मलकापूर तालुक्यातील कुंड फाटा येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. चौकशीनंतर २६ ऑगस्ट २०२६ रोजी दोघांना अटक करण्यात आली.
आरोपींकडून फिर्यादीच्या पतीचा जबरीने चोरून नेलेला मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले आहे. दोन्ही आरोपी २९ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडीत असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईत जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक खामगाव सोहन माढरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.



