12.4 C
New York
Monday, October 19, 2026

Buy now

spot_img

टाकरखेड हेलगा येथे शेत रस्त्यासाठी शेतकऱ्यांचे शेतात आमरण उपोषण… २०१६ मध्ये रस्ता खुला करण्याचा तहसीलदारांचा आदेश; तरीही अंमलबजावणी नाही, ७ एकर जमीन पडीत….

बुलढाणा ब्रेकिंग

टाकरखेड हेलगा येथे शेत रस्त्यासाठी शेतकऱ्यांचे शेतात आमरण उपोषण…
२०१६ मध्ये रस्ता खुला करण्याचा तहसीलदारांचा आदेश; तरीही अंमलबजावणी नाही, ७ एकर जमीन पडीत….

चिखली तालुक्यातील टाकरखेड हेलगा येथील शेत रस्त्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याचा आरोप करत शेतकरी दामोधर कदम व रामकृष्ण कदम यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. २९ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांनी आपल्या गट क्रमांक ११५ मधील शेतात उपोषण सुरू केले आहे.
आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ता खुला करून देण्यात यावा, अशी मागणी या शेतकऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून महसूल विभागाकडे केली आहे. या प्रकरणाचा दीर्घकाळ न्यायनिवाडा सुरू होता. दरम्यान, २०१६ साली तत्कालीन तहसीलदारांनी सदर रस्ता मोकळा करण्याबाबत आदेशही पारित केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्याने शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
रस्ता उपलब्ध नसल्यामुळे शेती करणे दिवसेंदिवस कठीण होत असून, यंदा या शेतकऱ्यांची तब्बल ७ एकर जमीन पडीत राहिली आहे. पेरणी करावी तर शेतात पोहोचायचे कसे आणि शेतीमाल तयार झाल्यानंतर तो बाहेर काढायचा कसा, असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. रस्ता नसल्यामुळे जमीन विक्रीस काढली तरी ती घेण्यासही कोणी तयार होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
‘न्याय मागायचा तरी कोणाकडे?’ असा सवाल उपस्थित करत अखेर लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्याचा निर्णय कदम बंधूंनी घेतला आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
दरम्यान, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने भर पावसात जंगल परिसरातील शेतात उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. परिसरात वन्यप्राण्यांचा वावर असल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शेत रस्त्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावून २०१६ मधील आदेशाची अंमलबजावणी करावी आणि शेती करण्याचा मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी दामोधर कदम व रामकृष्ण कदम यांनी केली आहे. आता प्रशासन या उपोषणाची दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काय भूमिका घेते, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या