बुलढाणा
*जिल्ह्याची सीमा बदलली म्हणून पाऊस बदलतो का? शेजारील जिल्हे दुष्काळसदृश, मग बुलढाण्यात पाऊस कुठून पडला?*
*कागदावरील आकडे नकोत, शेतकऱ्यांच्या बांधावर या! बुलढाणा दुष्काळसदृश यादीतून वगळल्याने शेतकरी योद्धा कृती समिती आक्रमक*
राज्य शासनाने दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर केली असून, या यादीतून बुलढाणा जिल्ह्याला वगळण्यात आल्याने शेतकरी योद्धा कृती समितीने शासनाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील प्रत्यक्ष पीक परिस्थिती आणि शासनाच्या कागदावरील निर्णय यामध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप समितीने केला आहे.
बुलढाणा जिल्ह्याच्या आजूबाजूचे जिल्हे दुष्काळसदृश परिस्थितीत येऊ शकतात, मग बुलढाण्यातील शेतकऱ्यांच्या शेतात नेमका कोणता वेगळा पाऊस पडला, असा थेट सवाल समितीने उपस्थित केला आहे. विशेषतः बुलढाणा जिल्ह्याला लागून असलेल्या जालना जिल्ह्यातील सीमावर्ती भागाचा दाखला देत समितीने शासनाच्या निकषांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकरी आणि जालना जिल्ह्यातील सीमेलगतचा शेतकरी यांच्यामध्ये काही ठिकाणी काही फुटांचे किंवा काहीशे मीटरचे अंतर असू शकते. जमीन, आकाश, ढग आणि पावसाची परिस्थिती जवळपास समान असताना केवळ प्रशासकीय सीमारेषेमुळे एका बाजूला दुष्काळसदृश परिस्थिती आणि दुसऱ्या बाजूला ती नसल्याचे कसे ठरवले जाते, असा सवाल समितीने केला आहे.
“जिल्ह्याची सीमारेषा कागदावर असते; मात्र शेतकऱ्याच्या शेतातील तहान खरी असते,” असे म्हणत समितीने शासनाने प्रत्यक्ष बांधावर जाऊन परिस्थिती पाहण्याची मागणी केली आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका आणि ज्वारी यांसारख्या पिकांवर संकट निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांनी बियाणे, खत, औषधे आणि मजुरीसाठी मोठा खर्च केला. अनेकांनी कर्ज काढून पिके उभी केली. मात्र पावसाअभावी पिके वाळत असल्याने उत्पादनाची आशा मावळत चालली आहे.
“शेतात हिरवेगार पीक नाही, वाळलेली पिके आहेत; घरात धान्याची पोती नाहीत, तर कर्जाच्या पावत्या आहेत,” अशी शेतकऱ्यांची व्यथा समितीने मांडली आहे.
शासनाच्या यादीत बुलढाणा जिल्ह्याला स्थान मिळाले नसल्याने प्रत्यक्ष परिस्थिती कोणती आणि सरकारी आकडे कोणते, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे कागदावरील आकडेवारीवर अवलंबून न राहता प्रशासनाने प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक परिस्थितीची पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतकरी योद्धा कृती समितीने बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा स्वतंत्र आणि तातडीने आढावा घेण्याची मागणी केली असून, जिल्ह्याचा दुष्काळसदृश यादीत समावेश करून शेतकऱ्यांना तातडीने मदतीचा दिलासा देण्याचे आवाहन शासनाला केले आहे.
“आम्हाला सरकारशी संघर्ष करायचा नाही; मात्र सरकारने शेतकऱ्याला संघर्ष करण्यास भाग पाडू नये,” असा इशाराही समितीने दिला आहे.
दरम्यान, शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास शेतकरी योद्धा कृती समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोबत घेऊन लवकरच रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समितीने दिला आहे.
“शेतकऱ्याला दुष्काळाच्या यादीत नाव नको; त्याला संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारचा आधार हवा आहे. शेतकरी न्याय मागतोय, भीक मागत नाही,” अशी भूमिका शेतकरी योद्धा कृती समिती, बुलढाणा जिल्ह्याने मांडली आहे.



