बुलढाणा ब्रेकिंग
*गणेशोत्सव भक्तिभावाने साजरा करा; डीजे टाळा, पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्या!*
*गणेश मंडळांसाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे आवाहन; अनुचित प्रकार रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त*
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गणेश मंडळे आणि नागरिकांनी उत्सव शांततेत, भक्तिभावाने आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले आहे.
येत्या काळात बुलढाणा जिल्ह्यातील विविध शहरांसह ग्रामीण भागात गणेश चतुर्थीपासून पुढील दहा दिवस गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून विविध ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. गणेश मंडळांनी तसेच नागरिकांनी उत्सव साजरा करताना प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. विशेषतः मोठ्या आवाजातील डीजेचा वापर टाळून पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, जेणेकरून ध्वनिप्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्ण तसेच इतर नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन एसपी निलेश तांबे यांनी केले आहे.
भक्ती, उत्साह आणि सामाजिक सलोखा कायम ठेवत गणेशोत्सव साजरा करा आणि पोलिस प्रशासनाला सहकार्य करा, असेही जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्पष्ट केले आहे.



