बुलढाणा ब्रेकिंग
*अवैध धंद्यांविरोधात बुलढाणा पोलिसांची धडक कारवाई; ८ दिवसांत १०५ गुन्हे दाखल, १५३ आरोपींवर कारवाई….*
*दारू, जुगार, आर्म्स, गांजा आणि अवैध वाळूवर पोलिसांचा कडक प्रहार; तब्बल २ कोटी १५ लाखांचा मुद्देमाल जप्त*
आगामी महत्त्वाचे सण-उत्सव शांततेत आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बुलढाणा जिल्हा पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील अवैध धंदे करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जात आहे. मागील आठवड्यापासून या कारवाईला वेग देण्यात आला असून, अवघ्या आठवडाभरात विविध प्रकारचे १०५ गुन्हे दाखल करून १५३ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी तब्बल २ कोटी १५ लाख ६७ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अवैध दारू, जुगार, शस्त्र बाळगणे, गांजाची तस्करी तसेच अवैध गौण खनिज वाळू चोरीविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम राबविली. दारूविरोधात ७६ कारवाया
जिल्ह्यात अवैध देशी, विदेशी दारू तसेच गावठी हातभट्टी दारूच्या केसेसवर कारवाई करण्यात आली. ७६ प्रकरणांत ७६ आरोपींना पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून ३ लाख ९२ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
जुगार अड्ड्यांवरही पोलिसांचा छापा
जुगारविरोधी कारवाईत २१ प्रकरणे दाखल करून ६३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून २ लाख ९९ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आर्म्स ॲक्टखाली कारवाई; शस्त्रे जप्त
आर्म्स ॲक्टअंतर्गत जिल्ह्यात २ गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत ४ आरोपींवर कारवाई करत पोलिसांनी १ पिस्तूल, १ मॅग्झीन, १ चाकू, १ कोयता, २ मोटारसायकल आणि १ मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. या मुद्देमालाची किंमत १ लाख ८६ हजार ३०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. गांजा बाळगणाऱ्यांवर NDPS Act अंतर्गत कारवाई
अवैधरीत्या गांजा बाळगणाऱ्या इसमांविरुद्ध NDPS Act अंतर्गत २ गुन्ह्यांमध्ये २ आरोपींवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १ किलो १७० ग्रॅम गांजा, किंमत ५८ हजार ५०० रुपये, जप्त करण्यात आला. अवैध वाळू वाहतुकीवरही धडक
अवैध गौण खनिज अर्थात वाळू चोरीविरोधातही पोलिसांनी कारवाई केली. ४ गुन्ह्यांत ८ आरोपींना ताब्यात घेण्यात आले, तर त्यांच्या ताब्यातून वाहनांसह तब्बल २ कोटी ६ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली मागील आठवड्यापासून राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत विविध हेडखाली १०५ गुन्हे दाखल करून १५३ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. अवैध धंद्यांविरोधातील ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचा इशारा बुलढाणा पोलिसांनी दिला आहे. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.



