बुलढाणा ब्रेकिंग
*गणेशोत्सवातील महाप्रसादासाठी व्यावसायिक गॅस सिलेंडरच सक्तीचा..*
*घरगुती सिलेंडरचा वापर केल्यास फौजदारी कारवाई; जिल्हा पुरवठा विभागाचे सर्व तहसीलदारांना कडक निर्देश*
बुलढाणा : आगामी गणेशोत्सव तसेच येणाऱ्या सार्वजनिक उत्सवांमध्ये गणेश मंडळांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या महाप्रसाद आणि भोजनासाठी आता केवळ व्यावसायिक गॅस सिलेंडरचाच वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी होणारा गैरवापर रोखण्यासाठी बुलढाणा जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
महाप्रसाद तयार करताना मोठ्या प्रमाणात स्वयंपाक केला जातो. यावेळी काही मंडळांकडून अज्ञान किंवा दुर्लक्षामुळे घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. मात्र, मोठ्या भांड्यांसाठी आणि मोठ्या प्रमाणातील स्वयंपाकासाठी घरगुती सिलेंडरचा वापर धोकादायक ठरू शकतो, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे.
घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या वापराची पद्धत, बर्नर तसेच गॅस प्रेशरमध्ये फरक असतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक करताना नियमबाह्य सिलेंडरचा वापर केल्यास आग किंवा स्फोटासारख्या दुर्घटनेचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचे निर्देश दिले आहेत.
यासोबतच घरगुती सिलेंडरचा व्यावसायिक वापर नियमबाह्य असल्याने दुर्घटना घडल्यास संबंधितांवर कायदेशीर आणि फौजदारी कारवाईची शक्यता आहे. तसेच घरगुती सिलेंडरचा बेकायदेशीर वापर झाल्याचे सिद्ध झाल्यास विमा संरक्षणाच्या बाबतीतही अडचणी निर्माण होऊ शकतात.
*परवानगी देतानाच अट लागू होणार..*
सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप, ध्वनी व्यवस्था किंवा महाप्रसादासाठी परवानगी देताना संबंधित प्रशासनाकडून महाप्रसादासाठी केवळ व्यावसायिक सिलेंडरचा वापर करणे बंधनकारक असल्याची अट परवानगीपत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलीस प्रशासनानेही संयुक्तपणे परिपत्रक काढून जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांना या नियमाची पूर्वकल्पना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी आपल्या तालुक्यातील गणेश मंडळांना याबाबत सूचना देऊन आवश्यक कार्यवाही करावी आणि केलेल्या कारवाईचा अहवाल जिल्हा कार्यालयाकडे सादर करावा, असे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी आनंद पडोळे यांनी दिले आहेत. दरम्यान, ग्राहक दक्षता कल्याण फाऊंडेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष नितीन सोळंके यांनी प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. गणेशोत्सव हा आनंदाचा आणि भक्तीचा सण असून महाप्रसादाच्या आयोजनात सुरक्षेशी तडजोड होऊ नये. सर्व गणेश मंडळांनी नियमांचे पालन करून केवळ व्यावसायिक सिलेंडरचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. महाप्रसादाचा उत्सव आनंदात साजरा करा; मात्र सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करू नका, असा स्पष्ट संदेश जिल्हा प्रशासनाने गणेश मंडळांना दिला आहे.



