बुलढाणा ब्रेकिंग
*गोंधळ या मराठी चित्रपटाची ९९व्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड…*
*चित्रपट निर्माता सुनील शेळके यांनी अभिनेते कैलास वाघमारे यांच्यासह संपूर्ण ‘गोंधळ’ टीमचे केले अभिनंदन…*
*महाराष्ट्राच्या मातीतील ‘गोंधळ’ची ऑस्करवारी; निर्माता सुनील शेळके यांच्याकडून संपूर्ण टीमचे अभिनंदन*
महाराष्ट्राच्या मातीतील लोकपरंपरा, संस्कृती आणि माणसांच्या जगण्यातील संवेदना रुपेरी पडद्यावर प्रभावीपणे मांडणाऱ्या ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची ९९व्या अकादमी पुरस्कारांसाठी अर्थात ऑस्कर २०२७ साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने ३३ चित्रपटांमधून ‘गोंधळ’ची निवड केली आहे.
या ऐतिहासिक यशाबद्दल चित्रपट निर्माता सुनील शेळके यांनी प्रसिद्ध अभिनेते कैलास वाघमारे तसेच ‘गोंधळ’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तसेच चित्रपटाच्या पुढील ऑस्कर प्रवासासाठी त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
डावकर फिल्म्स प्रस्तुत आणि संतोष डावखर लिखित-दिग्दर्शित ‘गोंधळ’ हा चित्रपट ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक गोंधळ या लोकपरंपरेभोवती उलगडतो. महाराष्ट्राच्या लोककला, श्रद्धा, सामाजिक वास्तव आणि मानवी भावभावनांना चित्रपटाने कथानकातून अधोरेखित केले आहे.
चित्रपटाच्या या निवडीमुळे मराठी चित्रपटसृष्टीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे व्यासपीठ मिळाले असून, महाराष्ट्राच्या मातीतली कथा आता जगभर पोहोचण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, अशी भावना सुनील शेळके यांनी व्यक्त केली.
दरम्यान, ‘गोंधळ’चे दिग्दर्शक संतोष डावखर यांना यापूर्वी ५६व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा सिल्व्हर पीकॉक पुरस्कार मिळाला आहे.
**‘गोंधळ’च्या ऑस्कर प्रवासामुळे मराठी सिनेमाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, संपूर्ण महाराष्ट्रातून चित्रपटाच्या टीमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.**



