बुलढाणा ब्रेकिंग
पावसाअभावी सोनाळ्याच्या संत्रा उत्पादनाला मोठा फटका; ५ हजार हेक्टरवरील संत्राबागा संकटात….
संत्र्यांचा दर्जा घसरला, प्रक्रिया उद्योगात शुकशुकाट; शेतकरी, शेतमजूर आणि उद्योजकांवर आर्थिक संकट….
पावसाअभावी संत्रा उत्पादनात लक्षणीय घट; सोनाळ्याच्या संत्र्यांचा गोडवा संकटात….
नागपूरच्या संत्र्यांनंतर देशभरात मागणी असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा परिसरातील संत्रा उत्पादनाला यंदा पावसाच्या कमतरतेचा मोठा फटका बसला आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सोनाळा परिसरात जवळपास पाच हजार हेक्टर क्षेत्रावर संत्र्यांची लागवड करण्यात आली आहे. मात्र, यंदा पुरेसा पाऊस न झाल्याने संत्रा उत्पादनात मोठी घट झाली असून, संत्रा उत्पादक शेतकरी, शेतमजूर आणि प्रक्रिया उद्योगासमोर गंभीर संकट उभे ठाकले आहे.
सोनाळा परिसरातील संत्री त्यांच्या गोड चवीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे या संत्र्यांना देशभरातून मोठी मागणी असते. मात्र, यंदा पावसाअभावी उत्पादन घटण्यासोबतच संत्र्यांचा दर्जाही खालावला आहे. बाजारात संत्र्यांना मागणी असली, तरी अपेक्षित दर्जाची संत्री उपलब्ध होत नसल्याने व्यापाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बुलढाणा जिल्ह्यात संत्रा प्रक्रिया करणारा एकमेव प्रकल्प असल्याचे सांगितले जाते. मात्र, यंदा संत्र्यांची उपलब्धता कमी झाल्याने या प्रकल्पातही शुकशुकाट पाहायला मिळत आहे. संत्र्यांचा पुरवठा घटल्याचा थेट परिणाम प्रक्रिया उद्योगावर होत असून, या उद्योगाशी संबंधित रोजगार आणि आर्थिक उलाढालीवरही संकट निर्माण झाले आहे.
संत्रा उत्पादनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळण्याची आशा धूसर झाली आहे. संत्राबागांमध्ये काम करणाऱ्या शेतमजुरांच्या रोजगारावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, प्रक्रिया उद्योगाला पुरेशा प्रमाणात कच्चा माल मिळत नसल्याने उद्योजकांसमोरही आर्थिक आव्हान उभे राहले आहे
सोनाळ्याच्या संत्र्यांना बाजारपेठेत मागणी कायम असतानाही यंदा उत्पादनातील घट आणि गुणवत्तेतील घसरण यामुळे संत्रा व्यवसायाची संपूर्ण साखळी अडचणीत आली आहे. पावसाच्या कमतरतेमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीचा फटका संत्रा उत्पादकांपासून ते व्यापारी आणि प्रक्रिया उद्योजकांपर्यंत सर्वांनाच बसत आहे.
एकीकडे दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करणारा शेतकरी आणि दुसरीकडे कच्च्या मालाअभावी अडचणीत आलेला प्रक्रिया उद्योग, अशी सोनाळा परिसरातील संत्रा व्यवसायाची स्थिती बनली आहे. त्यामुळे यंदाचा संत्रा हंगाम शेतकरी, शेतमजूर आणि उद्योजकांसाठी आर्थिक कसोटीचा ठरत आहे



