14 C
New York
Sunday, October 18, 2026

Buy now

spot_img

महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी ‘प्रोजेक्ट संजीवनी’ जिल्ह्यात कार्यान्वित…* *विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या हस्ते शुभारंभ; महिला सुरक्षा, बालविवाह प्रतिबंध आणि सायबर सुरक्षेसह सात प्रमुख उपक्रमांवर भर…*

बुलढाणा ब्रेकिंग

*महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी ‘प्रोजेक्ट संजीवनी’ जिल्ह्यात कार्यान्वित…*

*विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या हस्ते शुभारंभ; महिला सुरक्षा, बालविवाह प्रतिबंध आणि सायबर सुरक्षेसह सात प्रमुख उपक्रमांवर भर…*

महिला व बालकांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी बुलढाणा जिल्हा पोलिसांच्या वतीने ‘प्रोजेक्ट संजीवनी’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या हस्ते १४ ऑक्टोबर रोजी बुलढाणा येथील सहकार विद्या मंदिरात या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. या प्रकल्पांतर्गत महिला व बालकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे, जनजागृती करणे, संकटाच्या काळात तातडीची मदत मिळवून देणे आणि महिला व बालकांविरोधातील गुन्ह्यांना प्रतिबंध घालणे, यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

‘प्रोजेक्ट संजीवनी’मध्ये समुदाय संवाद व मानसिक आधार, शालेय जनजागृती व कायदेशीर मार्गदर्शन, बालविवाह प्रतिबंध, ‘दामिनी पथक’मार्फत महिला सुरक्षा गस्त, डायल ११२ आपत्कालीन मदत, हरविलेल्या महिला व मुलांचा शोध आणि महिलांविरोधी गुन्ह्यांना प्रतिबंध अशा सात प्रमुख बाबींचा समावेश आहे.
शाळा व महाविद्यालयांमध्ये पोलीस काका आणि पोलीस दीदी यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण केली जाणार आहे. गुड टच-बॅड टच, बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण, सायबर सुरक्षा, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर आणि संकटाच्या वेळी मदत कशी मिळवावी, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

बालविवाह रोखण्यासाठी पालक, शिक्षक, ग्रामस्थ आणि सामाजिक घटकांमध्ये जनजागृती केली जाणार असून, महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकांकडून शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, बसस्थानके आणि गर्दीच्या ठिकाणी नियमित गस्त घालण्यात येणार आहे. छेडछाड, पाठलाग आणि इतर असुरक्षित प्रकारांना प्रतिबंध घालण्यासोबतच आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत डायल ११२ या क्रमांकावर मदत मागण्यासाठी महिला व बालकांना प्रोत्साहित केले जाणार आहे. तसेच हरविलेल्या महिला व मुलांचा शोध घेण्यासाठी तांत्रिक साधने, तपास कौशल्य आणि विविध यंत्रणांमधील समन्वयाचा प्रभावी वापर केला जाणार आहे. महिलांविरोधी गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती, प्रभावी पोलीस गस्त, तक्रारींवर कायदेशीर कारवाई आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग यावरही भर देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’साठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून आंतरराष्ट्रीय पेरा बॅडमिंटन पदकविजेत्या कु. तुलिका सतीशचंद्र जाधव यांची निवड करण्यात आली. त्यांच्या माध्यमातून महिला व बालकांच्या सुरक्षेचा संदेश अधिक व्यापक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी केले. यावेळी खामगाव, मलकापूर, बुलढाणा आणि जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांचे अधिकारी, शालेय व महाविद्यालयीन शिक्षक तसेच सुमारे १२०० विद्यार्थी उपस्थित होते. महिला व बालकांची सुरक्षा ही केवळ पोलिसांची नव्हे, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. ‘प्रोजेक्ट संजीवनी’च्या माध्यमातून सुरक्षित, जागरूक आणि भयमुक्त वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने बुलढाणा जिल्हा पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या