बुलढाणा
*बुलढाणा जिल्ह्यात ० ते ४० वयोगटातील नागरिकांची सिकलसेल तपासणी मोहीम..*
*जिल्ह्यात सिकलसेलचे 300 रुग्ण अस्तित्वात…*
बुलढाणा जिल्ह्यात सिकलसेल या आनुवंशिक आजाराचे सुमारे ३०० रुग्ण नोंदणीकृत असून, या रुग्णांची वेळोवेळी तपासणी व उपचार आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुरू आहेत. सिकलसेल हा रक्ताशी संबंधित गंभीर आजार असून, वेळेत निदान झाल्यास त्यावर प्रभावी उपचार करता येतात.
राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या आदेशानुसार, या आठवड्यात जिल्ह्यातील ० ते ४० वर्षे वयोगटातील नागरिकांची विशेष सिकलसेल तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे तसेच ग्रामीण भागात विशेष तपासणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.
या तपासणी मोहिमेद्वारे आजाराचे लवकर निदान करणे, संभाव्य रुग्ण ओळखणे व त्यांना योग्य उपचार व समुपदेशन देणे हा उद्देश आहे. तपासणीत सिकलसेल पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रुग्णांना पुढील वैद्यकीय उपचारासाठी संदर्भित करण्यात येणार असून, आवश्यक औषधोपचार मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
यासोबतच नागरिकांमध्ये सिकलसेल आजाराबाबत जनजागृती, विवाहपूर्व तपासणीचे महत्त्व, गर्भवती महिलांची तपासणी व मार्गदर्शन यावर विशेष भर देण्यात येणार आहे. भविष्यात सिकलसेल रुग्णसंख्या कमी करण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरणार आहे.
याबाबत माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी सांगितले की, “जिल्ह्यातील ० ते ४० वयोगटातील सर्व नागरिकांनी या तपासणी मोहिमेत सहभागी व्हावे. सिकलसेल आजाराचे लवकर निदान झाल्यास गंभीर धोके टाळता येतात,” असे आवाहन त्यांनी केले आहे.



