माटरगाव येथे शेतकऱ्यांशी थेट संवाद; अभिता लँड सोल्यूशन्स व अभिता अॅग्रो इंडस्ट्रीजकडून आधुनिक कृषी उपक्रमांची माहिती

बुलढाणा :
शेगाव तालुक्यातील माटरगाव येथे परिसरातील शेतकरी बांधवांसोबत सविस्तर संवाद साधण्यात आला. या संवादाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीविषयक अडचणी, गरजा व भविष्यातील अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेतीतील बदलते आव्हान, उत्पादन खर्च, बाजारपेठेतील अडचणी, तांत्रिक ज्ञानाची गरज आदी विषयांवर शेतकऱ्यांनी मनमोकळेपणाने आपली मते मांडली.

यावेळी Abhita Land Solutions Pvt. Ltd. आणि Abhita Agro Industries Pvt. Ltd. चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुनील शेळके यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. आधुनिक शेतीसाठी आवश्यक असलेल्या कृषी सेवा, जमिनीचे परीक्षण, पीक नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादन वाढीसाठी तांत्रिक मार्गदर्शन तसेच शाश्वत शेती पद्धतींबाबत उपस्थित शेतकऱ्यांना अवगत करण्यात आले.
सुनील शेळके यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि बाजारपेठेशी थेट जोड निर्माण करणे हा अभिता समूहाचा मुख्य उद्देश आहे. भविष्यात शेतकऱ्यांसाठी नवीन तंत्रज्ञानाधारित योजना, प्रशिक्षण शिबिरे, सल्ला सेवा तसेच शेतीपूरक उद्योगांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या संवाद कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांच्या समस्या थेट जाणून घेण्यास मदत झाली असून, शेती क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमास परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



