30.4 C
New York
Thursday, April 16, 2026

Buy now

spot_img

जिल्ह्यातील ५ लाख विद्यार्थी देशभक्तीपर गीतांवर करणार कवायत संचलन…* *प्रजासत्ताक दिनानिमित्त अनोखा उपक्रम; २,४६७ शाळांचा उत्स्फूर्त सहभाग…*

बुलढाणा ब्रेकिंग

*जिल्ह्यातील ५ लाख विद्यार्थी देशभक्तीपर गीतांवर करणार कवायत संचलन…*

*प्रजासत्ताक दिनानिमित्त अनोखा उपक्रम; २,४६७ शाळांचा उत्स्फूर्त सहभाग…*

शालेय विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना, शिस्त, आरोग्य जागृती आणि देशभक्तीचा संस्कार रुजवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार २६ जानेवारी २०२६ रोजी देशभक्तीपर गीतांवर आधारित सामूहिक कवायत व संचलन राज्यभरात आयोजित करण्यात येणार असून, बुलढाणा जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या २,४६७ शाळांमधील सुमारे ५ लाख विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये देशभक्तीपर गीतांवर आधारित सामूहिक कवायत संचलन होणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे. यापूर्वी १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अशाच प्रकारचा उपक्रम राबविण्यात आला होता. त्याच धर्तीवर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम पुन्हा एकदा अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे.
या उपक्रमामागील मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, व्यायामाची आवड निर्माण करणे तसेच “राष्ट्र प्रथम” ही भावना रुजवून त्यांच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करणे हा आहे. विद्यार्थ्यांमध्ये शालेय शिस्त, आरोग्य, राष्ट्रीय ऐक्य व सामाजिक जबाबदारीची भावना वृद्धिंगत व्हावी, यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
प्रत्येक शाळेत स्वतंत्रपणे कवायत संचलन होणार असून, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तालुकास्तरीय सामूहिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांना संबंधित गावातील शाळा व्यवस्थापन समिती, माता–पालक समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती, शालेय भौतिक सुविधा विकास समिती, शिक्षणप्रेमी नागरिक तसेच लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन बुलढाणा जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
तालुकास्तरीय कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय मैदानांची आकर्षक सजावट करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रम पोलीस कवायत मैदान, बुलढाणा येथे आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाला सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम वाढीस लागावे, राष्ट्र प्रथम ही भावना दृढ व्हावी, शालेय शिस्त, आरोग्य व राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक बळकट व्हावी, या उद्देशाने हा कार्यक्रम अत्यंत भव्य आणि न भूतो न भविष्यती स्वरूपात राबविण्यात येत आहे.
या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी नागरिक व लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या