बुलढाणा
*लोणार–मातळ रोडवर भीषण अपघात; भरधाव स्विफ्ट डिझायरची महिला मजुरांच्या ॲटोला धडक, एक महिला जागीच ठार तर आठ जण गंभीर जखमी….*

लोणार तालुक्यातील लोणार ते मातळ मार्गावर आज १ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव वेगात येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने महिला मजुरांना घेऊन जाणाऱ्या ॲटोला जोरदार धडक दिली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत… किनगावजटू येथून मातळकडे नेटसेटच्या कामासाठी महिला मजूर ॲटो (क्रमांक MH-28 R-2211) ने जात होत्या. बाजड यांच्या शेताजवळील वळणावर सरस्वतीच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने (क्रमांक MH-43 AF-5821) ॲटोला समोरून धडक दिली. धडकेमुळे ॲटो पलटी झाला आणि त्यातील महिला मजूर रस्त्याच्या कडेला फेकल्या गेल्या.

या अपघातात जरीनाबी अयुबशहा (वय ४५) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर रजना परमेश्वर कास्तोडे (वय ५३), शांताबाई शेवाळे (वय ४५), कल्पना विठ्ठल जमधाडे (वय ४०), अलका मधुकर शेवाळे (वय ४०), लक्ष्मण बबन करवते (वय ४५), चंद्रभागा गजानन नागरे (वय ४०), राधा गजानन नागरे तसेच ॲटो चालक आसिफ निंशालशहा (वय ३०) हे आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर स्विफ्ट डिझायर कारचा चालक घटनास्थळावरून फरार झाला असून सदर वाहन हे हिंवराखंड येथील असल्याची माहिती मिळाली आहे. जखमींना तातडीने १०८ रुग्णवाहिकेद्वारे लोणार ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर अतिगंभीर जखमींना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे हलविण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच लोणार पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून फरार चालकाचा शोध सुरू आहे. अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महिला मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



