बुलढाणा
*चौकशीत दोषी ठरूनही कारवाई शून्य; देऊळघाट ग्रामस्थांचा गटविकास कार्यालयात ठिय्या, बीडीओंचे कार्यालयातून पलायन…*
बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट ग्रामपंचायतीत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतील गंभीर आर्थिक गैरव्यवहार उघडकीस येऊनही दोषींवर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी जाब विचारण्यासाठी ग्रामस्थ आज थेट गट विकास अधिकारी कार्यालयात धडकले असता, गट विकास अधिकारी अमिता अजित पवार यांनी ग्रामस्थांना पाहून कार्यालय सोडून पलायन केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देऊळघाट ग्रामपंचायतीत ग्रामसचिव रजेवर असतानाही सरपंच व सचिव यांनी संगनमताने १५ व्या वित्त आयोगातील निधी अवैधरित्या काढून खर्च केल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. या तक्रारीची चौकशी केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसचिव व सरपंच यांच्यावर कारवाई करण्याचे लेखी आदेश गट विकास अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, तब्बल दोन वर्षांचा कालावधी लोटूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही…..
या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज सकाळी ११ वाजता गट विकास अधिकारी कार्यालय गाठून जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थ येत असल्याची माहिती मिळताच गट विकास अधिकारी कार्यालयातून निघून गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यानंतर दुपारपासून संध्याकाळपर्यंत म्हणजेच गेल्या आठ तासांपासून ग्रामस्थ गट विकास अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करत आहेत….
“जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही आणि गट विकास अधिकारी स्वतः कार्यालयात येऊन खुलासा करत नाहीत, तोपर्यंत आमचा ठिय्या सुरूच राहील,” अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. या आंदोलनामुळे पंचायत समिती परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे….
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर गट विकास अधिकारी अमिता अजित पवार यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र, चौकशीत दोषी आढळूनही कारवाई न होणे आणि वरिष्ठांच्या आदेशांकडे दुर्लक्ष होणे, यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे….
या प्रकरणाकडे आता जिल्हा प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष लागले असून, पुढील काही तासांत काय भूमिका घेतली जाते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



