*बुलढाण्यात भीषण अपघात…* —
*विद्यार्थ्यांनी भरलेल्या पिकअपची बुलेटशी धडक; एकाचा मृत्यू, चार विद्यार्थी गंभीर जखमी..*
बुलढाणा
बुलढाणा–देऊळघाट मार्गावर सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात विद्यार्थ्यांनी भरलेल्या इको पिकअप वाहनाची बुलेट दुचाकीशी जोरदार टक्कर होऊन एकाचा मृत्यू झाला, तर चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास निवांत हॉटेलजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा शहरातील विविध शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर देऊळघाट येथे त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी काही वाहने नियमितपणे ये-जा करतात. अशाच एका इको पिकअपमध्ये सात ते आठ विद्यार्थी प्रवास करत होते. देऊळघाटकडे परतत असताना या वाहनाची समोरून येणाऱ्या बुलेट दुचाकीशी जोरदार धडक झाली. स्थानिकांच्या मते, बुलेटने अचानक वळण घेतल्याने हा अपघात घडला असावा. धडक इतकी तीव्र होती की पिकअप वाहन दोन वेळा पलटी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या अपघातात बुलेटवरील रियाज बेग जफर बेग (वय ३८, रा. देऊळघाट) आणि मोहम्मद तौसिफ मोहम्मद युसुफ (वय ३८, रा. शेंदुर्णी, जामनेर) हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यापैकी मोहम्मद तौसिफ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तौसिफ हे देऊळघाट येथे आपल्या मामाकडे आले होते, अशी माहिती मिळाली आहे.
दरम्यान, पिकअपमधील महेश गणेश कानडे, रुद्र गजानन कटक, राजश्री शिवा माळोदे आणि शेजल शंकर कटक हे चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सर्वांवर उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अपघाताची पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.



