*हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावरून वाद; कन्या गार्गी सपकाळ यांची फेसबुक पोस्ट — विपर्यासाचा आरोप..*
अँकर
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अलीकडील वक्तव्यावरून सुरू असलेल्या राजकीय वादात आता त्यांच्या कन्या गार्गी सपकाळ यांनी फेसबुक पोस्टद्वारे भूमिका स्पष्ट केली आहे.
पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भातील वक्तव्याचा हेतुपुरस्सर विपर्यास करून राज्यात राजकीय गदारोळ निर्माण केला जात आहे. त्यांच्या मते, मूळ वक्तव्यात शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा गौरव करताना टिपू सुलतान यांनी त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेतल्याचा संदर्भ होता. मात्र त्या वक्तव्याला वेगळा अर्थ लावून वाद निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत वातावरण तापवल्याचा आरोप केला असून, याआधी भगतसिंग कोश्यारी, नितीन गडकरी यांच्याशी संबंधित वादग्रस्त विधानांवर सत्ताधाऱ्यांनी भूमिका घेतली नसल्याचाही उल्लेख केला आहे. तसेच बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणासह इतर ऐतिहासिक वादांचाही संदर्भ त्यांनी दिला आहे.
गार्गी सपकाळ यांनी पोस्टमध्ये नमूद केले की, वादानंतर सोशल मीडियावर त्यांना अपमानास्पद संदेश येत असून समाजात द्वेषाचे वातावरण तयार होत असल्याची खंत व्यक्त केली आहे. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ च्या विचारसरणीवरही टीका करत सामाजिक न्याय आणि समतेच्या मूल्यांचा उल्लेख केला. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, अहिल्याबाई होळकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करत समाजात ऐक्य राखण्याचे आवाहन केले आहे.
पोस्टच्या शेवटी त्यांनी सर्व धर्मीय आणि सर्व पक्षीय नागरिकांना शांतता, न्याय आणि बंधुतेच्या मूल्यांवर एकत्र उभे राहण्याचे आवाहन करत “खऱ्या स्वराज्यासाठी एकत्र लढा” असा संदेश दिला आहे.



