शिवजयंतीनिमित्त शारदाताई पाटील यांचे मनोगत — स्वराज्यात महिलांची सुरक्षितता आदर्श असल्याचा उल्लेख – शारदाताई पाटील, जिल्हाध्यक्षा शिवसेना…
बुलढाणा
शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवसेना (शिंदे गट) यांच्या महिला जिल्हाध्यक्ष शारदा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करत स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी त्यांनी स्वराज्यात महिलांना मिळालेल्या सुरक्षिततेचा विशेष उल्लेख करत त्यांच्या प्रशासनातील स्त्री-सन्मानाच्या धोरणांचा आदर्श मांडला.
कार्यक्रमात बोलताना पाटील म्हणाल्या की, महाराजांच्या राज्यकारभारात कायदा व सुव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य होते. महिलांच्या सन्मानाला धक्का लागेल असे कृत्य सहन केले जात नव्हते आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जात होती. त्यामुळे त्या काळात महिलांना सुरक्षित व सन्मानाचे वातावरण लाभले होते, असे त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.
पुढे त्यांनी नमूद केले की, आजच्या समाजानेही महाराजांच्या आदर्शांचा वारसा जपत स्त्री-सन्मान, सुरक्षितता आणि न्याय या मूल्यांचे पालन करणे गरजेचे आहे. स्वराज्याच्या इतिहासातून प्रेरणा घेऊन समाजात जागरूकता निर्माण करण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.
शिवजयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी महाराजांच्या जयघोषात कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



