बुलढाणा
*मलकापूर पांग्रा महसूल मंडळ सिंदखेडराजातच ठेवावे; १ मार्चपासून आमरण उपोषणाचा इशारा…*
मलकापूर पांग्रा महसूल मंडळाचा समावेश साखरखेर्डा अप्पर तहसील कार्यालयात न करता, साखरखेर्डा पूर्ण तालुका घोषित होईपर्यंत तो सिंदखेडराजा तहसील कार्यालयातच कायम ठेवावा, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे. या मागणीसाठी २४ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले असून, यापूर्वी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले होते.
१४ गावांचा समावेश; दुहेरी प्रवासाची भीती
निवेदनानुसार, मलकापूर पांग्रा मंडळातील मलकापूर पांग्रा, केशव शिवनी, वरदडी, बारलिंगा, देऊळगाव कोळ, कोनाटी, कुंबेफळ, ढोरवी, पोपळ शिवनी, वाघाळा, हिवरा गडलिंग, हनवतखेड, झोटिंगा, आगेफळ अशी १४ गावे साखरखेर्डा व सिंदखेडराजा यांच्या मधोमध आहेत.
अप्पर तहसील कार्यालय साखरखेर्डा येथे सुरू झाल्यास काही महसुली कामे तेथे होतील; मात्र तालुका दंडाधिकारी, तहसीलदार, खरेदी-विक्री संघ, पंचायत समिती, कृषी अधिकारी, महावितरण, दिवाणी-फौजदारी न्यायालय, उपविभागीय अधिकारी (एसडीओ), आरोग्य व शिक्षण विभाग आदी महत्त्वाच्या कार्यालयांसाठी नागरिकांना सिंदखेडराजा येथेच जावे लागणार आहे. त्यामुळे दुहेरी प्रवास, वेळ व खर्च वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
सध्याची सोय सिंदखेडराजातच
सध्या परिसरातील नागरिकांची बहुतांश शासकीय कामे सिंदखेडराजा येथे एकाचवेळी पूर्ण होतात. साखरखेर्डा येथे अपुऱ्या सुविधांसह अप्पर तहसील कार्यालय कार्यरत राहिल्यास नागरिकांची गैरसोय वाढेल, अशीही चिंता निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
आमरण उपोषणाचा इशारा
प्रशासकीय सोय, ऐतिहासिक व भावनिक नाते तसेच बाजारपेठ, आरोग्य व शैक्षणिक सुविधा लक्षात घेऊन साखरखेर्डा पूर्ण तालुका घोषित होईपर्यंत मलकापूर पांग्रा मंडळाचा समावेश सिंदखेडराजा तहसीलमध्येच ठेवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
अन्यथा १ मार्च २०२६ पासून सिंदखेडराजा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा अॅड. लुकमान शेख, शरद साळवे, डॉ. दिनकर सोनुने, तसेच १४ गावांतील सरपंच व नागरिकांनी दिला आहे.
आता प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



