बुलढाणा ब्रेकिंग ..
*माळवंडी खून प्रकरण तापले; पुरावे नष्ट केल्याचा आरोप,…*
*शवविच्छेदनावरही संशय – दोषींवर कठोर कारवाईची मागणी…*
*सकल मातंग समाजाचे रायपूर पोलीस ठाण्यात निवेदन;…*
*कारवाई न झाल्यास २४ मार्चला ठिय्या आंदोलनाचा इशारा..*

रायपूर पोलीस स्टेशन हद्दीतील माळवंडी येथे १९ मार्च रोजी घडलेल्या वामन काशीराम यंगड (वय ५२) यांच्या खून प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून, या प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आणि शवविच्छेदन प्रक्रियेत संशयास्पद बाबी असल्याचा आरोप सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात आला आहे. या संदर्भात २३ मार्च रोजी रायपूर पोलीस ठाणेदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार, माळवंडी येथील रहिवासी वामन यंगड यांच्यावर गावातील काही अपप्रवृत्तीच्या व्यक्तींनी जातीय द्वेषातून कटकारस्थान रचत अमानुष मारहाण केली आणि त्यांचा खून केला. घटनेनंतर आरोपींनी गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी मृतकाच्या अंगावरील कपडे बदलण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय, पीडित कुटुंबीयांवर दबाव टाकून दोषींना वाचवण्याचा प्रयत्न झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मृतदेहाच्या शवविच्छेदन प्रक्रियेतही हलगर्जीपणा झाला असून, ती प्रक्रिया संशयास्पद पद्धतीने पार पडल्याचा आरोप समाजाच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात संबंधित डॉक्टरांवरही चौकशी करून कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून, पोलिस प्रशासनाने तात्काळ आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी भूमिका सकल मातंग समाजाने घेतली आहे. अन्यथा, २४ मार्च रोजी रायपूर पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर कैलास भाऊ खंदारे, भगवान गायकवाड, गणेश अंभोरे, मुकेश खरात, ओमप्रकाश नाटेकर, श्याम यंगड, निखिल बोरकर, रामेश्वर वीरशीद यांच्यासह अनेक समाजबांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत…



