19.3 C
New York
Saturday, April 18, 2026

Buy now

spot_img

“29 एप्रिलचा अल्टिमेटम! मागण्या न मानल्यास आंदोलन तीव्र – 1 मे ‘काळा दिवस’”…. “पिक विमा व बागायती मदतीसाठी शेतकऱ्यांचा इशारा;

“29 एप्रिलचा अल्टिमेटम! मागण्या न मानल्यास आंदोलन तीव्र – 1 मे ‘काळा दिवस’”….

“पिक विमा व बागायती मदतीसाठी शेतकऱ्यांचा इशारा; सिंदखेडराजा येथे आमरण उपोषणाचा इशारा”

बुलढाणा,

खरीप 2025 हंगामात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही शेतकऱ्यांना अद्याप पिक विम्याची रक्कम मिळालेली नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने सरकारला ठाम इशारा देण्यात आला आहे.
शासनाने नुकसान मान्य करून मदत जाहीर केली असली, तरी त्याच नुकसानीचा पिक विमा देण्यात येत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सुरुवातीला प्रशासन नुकसान मान्य करण्यास तयार नव्हते, मात्र शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष परिस्थिती दाखवून दिल्यानंतरच पाहणी करून मदत देण्यात आली, असे समितीने नमूद केले.
दरम्यान, बागायती क्षेत्राबाबतही अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. खरेदी-विक्रीवेळी बागायती निकष लागू केले जातात, मात्र मदत देताना तेच निकष विचारात घेतले जात नाहीत. त्यामुळे पात्र असूनही अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहत असल्याने संताप वाढत आहे.
या प्रश्नावर यापूर्वीही आंदोलन करण्यात आले होते. शेतकरी नेते बालाजी सोसे यांनी साठ फूट उंच पाण्याच्या टाकीवर अन्नत्याग आमरण उपोषण केले होते. त्यावेळी प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आले होते, मात्र त्याची अद्याप पूर्तता झालेली नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
समितीने सरकारकडे खरीप 2025 साठी सरसकट पिक विमा मंजूर करून त्वरित वितरित करण्याची मागणी केली आहे. तसेच बागायती निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, अन्यथा हे निकष व शुल्क लागू करू नयेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
१ मे हा महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन असल्याने प्रशासनाशी संघर्ष टाळून चर्चेतून मार्ग काढण्याची भूमिका समितीने घेतली आहे. यासाठी 29 एप्रिल 2026 पूर्वी मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांच्या स्तरावर तातडीची बैठक घेऊन शेतकरी प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनानंतर शेतकरी नेते बालाजी सोसे यांनी इशारा देताना सांगितले की, “29 एप्रिलच्या आत शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करून प्रश्न मार्गी लावा, अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी प्रशासनाची राहील.”
जर 29 एप्रिलपर्यंत ठोस निर्णय झाला नाही, तर सिंदखेडराजा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच 1 मे हा ‘काळा दिवस’ म्हणून पाळण्यात येणार असून प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या घरावर काळी गुढी उभारावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी बालाजी सोसे, प्रवीण भाऊ गीते, गजानन जायभाये, गणेश मुंडे, देवानंद सोसे, मधुकरराव शिंदे, विलास वाघ, आकाश खरात, शेख अत्तर, ज्ञानेश्वर (माजी सरपंच) व राजा दीपक साळवे आदी उपस्थित होते.
शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने “उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील,” असा इशाराही देण्यात आला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या