बुलढाणा
*फुलेप्रेमी कवींच्या संवेदनशीलतेचा आदर्श; दिवंगत शाहीर मनोहर पवार यांच्या कुटुंबाला 3 लाखांची आर्थिक मदत..*
*अवघ्या तीन दिवसांत उभारला निधी; विजय वडवेराव यांच्या पुढाकारातून साहित्यविश्वात नवा आदर्श..*
बुलढाणा जिल्ह्यातील केळवद येथील मराठा समाजातील शेतकरी, फुलेप्रेमी कवी व शाहीर मनोहर पवार यांचा शेतातील आंब्याच्या झाडावरून पडून दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावरील कर्त्या पुरुषाचे छत्र हरपले असून पत्नी व दोन मुलींवर दुःखाचा डोंगर कोसळला. अशा कठीण प्रसंगी देशभरातील फुलेप्रेमी कवी-कवयित्री त्यांच्या मदतीसाठी धावून आले. पुणे येथील भिडेवाडाकार फुलेप्रेमी संविधान दूत तथा देशातील पहिली मुलींची शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियान आणि आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलचे आयोजक विजय वडवेराव यांनी मनोहर पवार यांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदतीचे भावनिक आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला देशभरातील शेकडो फुलेप्रेमी कवी-कवयित्रींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अवघ्या तीन दिवसांच्या कालावधीत तब्बल तीन लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आला. मनोहर पवार यांच्या दहाव्याच्या विधीच्या दिवशी केळवद येथे प्रत्यक्ष भेट देत विजय वडवेराव यांनी समाजाच्या साक्षीने पवार यांच्या पत्नी व दोन्ही मुलींना तीन लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. या आर्थिक मदतीमुळे पवार कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून दोन्ही मुलींच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी हा निधी उपयोगी ठरणार आहे. सहकारी कवीच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबाच्या मदतीसाठी देशभरातील कवींनी एकत्र येत एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उभारल्याची घटना साहित्य क्षेत्रात दुर्मीळ मानली जात असून यामुळे सामाजिक बांधिलकीचा एक आदर्श निर्माण झाला आहे. यावेळी फुलेप्रेमी परिवार प्रमुख तथा अभियानाचे आयोजक विजय वडवेराव, अरविंद बनसोडे, संजय हिवाळे, डॉ. मंजू गौतम राजेजाधव, मारोती कदम यांच्यासह फुलेप्रेमी कवी, ग्रामस्थ, कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशातील पहिली मुलींची शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियान आणि आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलच्या माध्यमातून विजय वडवेराव हे फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा तसेच भारतीय संविधानाचा प्रचार-प्रसार करत संविधान दूत घडविण्याचे कार्य देशभरात करीत आहेत. मनोहर पवार यांच्या कुटुंबाला देण्यात आलेली ही मदत सामाजिक संवेदनशीलता आणि साहित्यिक एकोप्याचे प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे.



