27.2 C
New York
Saturday, August 8, 2026

Buy now

spot_img

जल जीवन मिशनची तब्बल 250 कोटींची देयके थकीत; जिल्ह्यातील 200 ठेकेदार आर्थिक संकटात..*

बुलढाणा ब्रेकिंग

*जल जीवन मिशनची तब्बल 250 कोटींची देयके थकीत; जिल्ह्यातील 200 ठेकेदार आर्थिक संकटात..*

*कामे पूर्ण करूनही पैसे नाहीत; ठेकेदारांवर उपासमारीची वेळ, शासनाकडे तातडीने निधी देण्याची मागणी..*

केंद्र आणि राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्यात आली. मात्र ही कामे करून घेऊनही संबंधित ठेकेदारांची तब्बल 250 कोटी रुपयांची देयके अद्याप शासनाकडे थकीत असल्याचा गंभीर मुद्दा समोर आला आहे. जिल्ह्यातील जवळपास 200 ठेकेदारांना याचा फटका बसला असून अनेकांवर आर्थिक संकट ओढवले आहे.

जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचविण्याच्या उद्देशाने विविध गावांमध्ये पाणीपुरवठा योजना, जलवाहिन्या, पंपगृहे, जलकुंभ आणि इतर पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्यात आली होती. शासनाच्या निर्देशानुसार ठेकेदारांनी वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने ही कामे पूर्ण केली. मात्र कामे पूर्ण होऊन अनेक महिने उलटूनही ठेकेदारांची देयके अदा करण्यात आलेली नाहीत. जिल्ह्यातील सुमारे 200 ठेकेदारांचे एकत्रित 250 कोटी रुपयांहून अधिक रकमेचे बिल शासनाकडे प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे. देयके न मिळाल्याने ठेकेदारांना बँकांचे कर्ज, कामगारांचे वेतन, यंत्रसामग्रीचे हप्ते आणि बांधकाम साहित्य पुरवठादारांची देणी भागविणे कठीण झाले आहे. अनेक ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडले असून काहींवर उपासमारीची वेळ आल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
ठेकेदारांनी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून सर्व प्रलंबित देयके अदा करावीत, अशी मागणी केली आहे. अन्यथा जिल्हाभर आंदोलनाचा इशाराही काही ठेकेदार संघटनांनी दिला आहे. दरम्यान, जल जीवन मिशनच्या कामांमध्ये सहभागी झालेल्या ठेकेदारांना लवकरात लवकर न्याय मिळावा आणि थकीत देयके वितरित करावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शासन यावर काय निर्णय घेते, याकडे आता जिल्ह्यातील ठेकेदारांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या