29.2 C
New York
Friday, August 7, 2026

Buy now

spot_img

खरीप 2025 पीक विम्यापासून हजारो शेतकरी वंचित; न्यायासाठी शेतकरी योद्धा कृती समितीचा एल्गार

बुलढाणा

खरीप 2025 पीक विम्यापासून हजारो शेतकरी वंचित; न्यायासाठी शेतकरी योद्धा कृती समितीचा एल्गार

“चलो मुंबई”चा इशारा; पीक विमा मिळेपर्यंत संघर्ष अटळ, मंत्रालयावर धडक मोर्चाची चेतावणी..

सिंदखेडराजा, देऊळगाव राजा आणि लोणार तालुक्यातील हजारो शेतकरी आजही खरीप 2025 च्या पीक विमा लाभापासून वंचित असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान होऊनही संबंधित शेतकऱ्यांना अद्याप विमा मिळालेला नसल्याने शेतकरी योद्धा कृती समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
विशेष बाब म्हणजे या भागातील अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान राज्य शासनाने मान्य केले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत व मोबदला देखील देण्यात आला आहे. त्यामुळे शासनाला दिसलेले नुकसान पीक विमा कंपनीला का दिसले नाही, असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. शासनाने नुकसान मान्य केले असताना विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना विमा नाकारणे अन्यायकारक असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत.
या गंभीर प्रश्नाबाबत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची वाशीम येथे प्रत्यक्ष भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन आणि शासनाकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप समितीने केला आहे.
शेतकरी योद्धा कृती समितीने स्पष्ट इशारा देत सांगितले की, पीक विमा मिळेपर्यंत संघर्ष थांबणार नाही. प्रशासनाची उदासीनता, विमा कंपनीची मनमानी आणि शासनाची निष्क्रियता यामुळे शेतकऱ्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. गरज पडल्यास मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यासही शेतकरी मागे हटणार नसल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
“चलो मुंबई”चा नारा देण्याची वेळ शासनाने आणू नये, अन्यथा बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरातील पीक विमा वंचित शेतकरी मंत्रालयावर धडक देण्यासाठी सज्ज राहतील, असा इशाराही समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
दरम्यान, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा आणि लोणार तालुक्यातील सर्व पीक विमा वंचित शेतकऱ्यांनी आपल्या पीक विम्याच्या पावत्या, संबंधित कागदपत्रे आणि समितीकडून उपलब्ध करून देण्यात येणारे स्वतंत्र निवेदन भरून सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःचे निवेदन शासनाकडे पाठविणे आवश्यक असल्याचे समितीने म्हटले आहे.
“ही केवळ पीक विम्याची लढाई नसून शेतकऱ्यांच्या स्वाभिमान, अस्तित्व आणि न्यायासाठीची लढाई आहे. एकजूट करा, संघटित व्हा आणि न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवा,” असे आवाहन शेतकरी योद्धा कृती समिती, बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या