बुलढाणा ब्रेकिंग
जिल्ह्यातील धरणे कोरडी, बुलढाणा जिल्ह्यातील जलसाठा अवघा 22.37 टक्क्यांवर…
खडकपूर्णा पूर्णपणे तळाला; पावसाअभावी पाणीटंचाईचे संकट गडद..
बुलढाणा |
बुलढाणा जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून पाटबंधारे विभागाच्या आजच्या जलाशय अहवालाने चिंतेत भर टाकली आहे. जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांमधील एकूण जलसाठा केवळ 22.37 टक्के इतकाच शिल्लक राहिला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याचा प्रमुख जलस्रोत मानल्या जाणाऱ्या खडकपूर्णा धरणातील पाणीसाठा शून्यावर आला असून धरण मृतसाठ्यावर पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यातील नळगंगा, पेनटकळीसह अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांतील जलसाठा झपाट्याने घटत असल्याने नागरिक, शेतकरी आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. उन्हाळ्यानंतर अपेक्षित असलेला दमदार मान्सून अद्याप जिल्ह्यात सक्रिय झाला नसल्याने धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक होत नाही. परिणामी अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ग्रामीण भागात आधीच टँकरची मागणी वाढत असून काही गावांमध्ये पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. दुसरीकडे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांनाही पाण्याची चिंता सतावत आहे. पाऊस लांबल्यास शेतीसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो.
दरम्यान, जिल्ह्यातील धरणांची ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने तातडीने पाणी व्यवस्थापनाचे नियोजन करणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. आगामी काही दिवसांत मान्सूनने दमदार हजेरी लावली नाही तर बुलढाणा जिल्ह्यावर मोठ्या पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



