21 C
New York
Thursday, June 18, 2026

Buy now

spot_img

टीईटी परीक्षेसाठी बुलढाणा सज्ज! २२ केंद्रांवर १३ हजारांहून अधिक परीक्षार्थी; वेळेआधी पोहोचण्याचे आवाहन….

बुलढाणा ब्रेकिंग

टीईटी परीक्षेसाठी बुलढाणा सज्ज! २२ केंद्रांवर १३ हजारांहून अधिक परीक्षार्थी; वेळेआधी पोहोचण्याचे आवाहन….

टीईटी उमेदवारांनी हे नियम नक्की वाचा; बायोमेट्रिक तपासणी, फ्रीस्किंग अनिवार्य, उशिरा आल्यास प्रवेश नाही…

प्राथमिक शिक्षक पदासाठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) शासनाने अनिवार्य केली असून, नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या सेवेतील शिक्षकांसाठीही टीईटी पात्रता आवश्यक ठरल्याने या परीक्षेचे महत्त्व अधिक वाढले आहे. त्यामुळे यंदाच्या टीईटी परीक्षेकडे शिक्षक व उमेदवारांचे विशेष लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे येत्या २८ जून रोजी बुलढाणा शहर व परिसरातील २२ परीक्षा केंद्रांवर टीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेत पेपर-१ साठी ५,९५३ तर पेपर-२ साठी ७,१७४ असे एकूण १३,१२७ परीक्षार्थी सहभागी होणार आहेत.
टीईटी परीक्षा दोन सत्रांमध्ये होणार असून पेपर-१ हा इयत्ता १ ली ते ५ वीच्या शिक्षक पदासाठी, तर पेपर-२ हा इयत्ता ६ वी ते ८ वीच्या शिक्षक पदासाठी घेण्यात येणार आहे.
परीक्षा पारदर्शक, निःपक्षपाती आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर आधार बायोमेट्रिक पडताळणी व फ्रीस्किंग करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी वेळेपूर्वी केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे.
पेपर-१ साठी परीक्षार्थींनी सकाळी ८.३० वाजेपर्यंत, तर पेपर-२ साठी दुपारी १२.३० वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सकाळच्या सत्रात १०.१० नंतर आणि दुपारच्या सत्रात २.१० नंतर कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
परीक्षेला जाताना उमेदवारांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदान ओळखपत्र यापैकी कोणतेही एक मूळ फोटो ओळखपत्र आणि त्याची सत्यप्रत सोबत बाळगणे आवश्यक आहे.
तसेच परीक्षा केंद्रात मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, डिजिटल घड्याळ, पेजर, पेन किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर कारवाई केली जाऊ शकते.
दरम्यान, लेखनिकाची आवश्यकता असलेल्या दिव्यांग परीक्षार्थींनी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असून त्यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याकडून आवश्यक मंजुरी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
टीईटी परीक्षेसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून, परीक्षार्थींनी नियमांचे पालन करून वेळेत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या