22.9 C
New York
Saturday, August 8, 2026

Buy now

spot_img

बुलढाण्यातील दहशतखोर टोळक्यांवर पोलिसांचा धडाकेबाज प्रहार; तीन गंभीर गुन्हे दाखल, अनेक आरोपी जेरबंद*

बुलढाणा ब्रेकिंग

*बुलढाण्यातील दहशतखोर टोळक्यांवर पोलिसांचा धडाकेबाज प्रहार; तीन गंभीर गुन्हे दाखल, अनेक आरोपी जेरबंद*

*सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवणाऱ्या टोळ्यांवर बुलढाणा पोलिसांची कडक कारवाई; आणखी आरोपींचा शोध सुरू, नागरिकांना दिला इशारा.*

बुलढाणा शहरात सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात बुलढाणा शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जयहिंद चौक परिसरात झालेल्या हाणामारी, प्राणघातक हल्ला आणि दहशत माजविण्याच्या घटनांप्रकरणी पोलिसांनी एकूण तीन गंभीर गुन्हे दाखल करत अनेक आरोपींना अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून दोन गट आमनेसामने आले. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी लोखंडी रॉड, पाइप, दगड आणि लाकडी दांडक्यांनी हल्ला करून काही जणांना गंभीर जखमी केले. जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर बुलढाणा शहर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत आरोपींचा शोध सुरू केला. या कारवाईत प्रतीक आनंद बोर्डे, गणेश रामदास गवई, करण उर्फ मन्ना मायकल पेंढणे, अमित सुनील बेंडवाल यांच्यासह अनेक आरोपींना ताब्यात घेण्यात आले. काही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, तपासादरम्यान आणखी पुरावे समोर आल्यानंतर पोलिसांनी तिसरा स्वतंत्र गुन्हाही दाखल केला आहे. यामुळे या संपूर्ण प्रकरणातील गुन्हेगारी जाळे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
*पोलिसांचा स्पष्ट इशारा*
सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणे, चौकाचौकात शस्त्रांचे प्रदर्शन करणे, नागरिकांना धमकावणे, महिलांची छेडछाड करणे, अवैध शस्त्रे बाळगणे, बेकायदेशीर व्यवसाय करणे किंवा कायदा हातात घेणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा बुलढाणा पोलिसांनी दिला आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संग्राम पाटील आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

बुलढाणा शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, दहशत माजविणाऱ्या टोळ्यांवर यापुढेही अशाच कठोर कारवाया सुरू राहतील, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या