23.1 C
New York
Saturday, August 8, 2026

Buy now

spot_img

*’आय सपोर्ट सोनम’चे फलक हातात घेऊन बुलढाणेकर रस्त्यावर; सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा..*

बुलढाणा ब्रेकिंग

*‘आय सपोर्ट सोनम’चे फलक हातात घेऊन बुलढाणेकर रस्त्यावर; सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा..*

*महात्मा गांधी पुतळ्यासमोर काळ्याफिती लावून केंद्र सरकारचा निषेध; विविध क्षेत्रातील नागरिकांचे आंदोलन…*

शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या उपोषणाला आता देशभरातून पाठिंबा मिळत आहे. बुलढाण्यातही साहित्य, वैद्यकीय, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी एकत्र येत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर काळ्याफिती लावून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. “आय सपोर्ट सोनम” असे फलक हातात घेऊन आंदोलनकर्त्यांनी वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा जाहीर केला.
सविस्तर बातमी
नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर उपोषण सुरू केले आहे. उपोषणाला अनेक दिवस उलटून गेल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात असून, केंद्र सरकार या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे.
या आंदोलनाच्या समर्थनार्थ बुलढाणा शहरात विविध क्षेत्रातील जागरूक नागरिक एकत्र आले. जिल्हा परिषद परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सर्वांनी काळ्याफिती लावून केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला. यावेळी “आय सपोर्ट सोनम” असे फलक हातात घेत आंदोलनकर्त्यांनी सोनम वांगचुक यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला.
या आंदोलनात साहित्यिक, डॉक्टर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील नागरिक सहभागी झाले होते. शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता टिकवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. तसेच या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली.
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला देशभरातून वाढता पाठिंबा मिळत असून, बुलढाण्यातील हे आंदोलनही त्याचाच एक भाग असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. सरकारने आंदोलनाची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा देशभरात जनआंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Related Articles

ताज्या बातम्या